
देवरुख : मौजे साडवली या ठिकाणी २० फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वन विभागाला यश आले. रेस्क्यू करून त्याला बाहेर आणल्यानंतर तपासणी करून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
सकाळी ९ वाजता राजेश चव्हाण, साडवली (नैदरवाडी) यांच्या खासगी विहिरीमध्ये बिबटा हा पडल्याबाबतची माहिती प्रशासनाला देण्यात आली. यानंतर परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर, देवरुख व कर्मचाऱ्यांनी आवश्यक साहित्यासह प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी विहिरीत बिबट्या आधार घेत पोहत होता. त्यानंतर लोखंडी पिंजऱ्याला दोरी बांधून पिंजरा विहिरीमध्ये सोडला. काही क्षणातच बिबट्या पिंजऱ्यामध्ये येऊन सुरक्षित जेरबंद झाला. त्यानंतर बिबट्याची सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघु चिकित्सालय देवरुख यांनी तपासणी केली. बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
हे रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल संगमेश्वर देवरुख सागर गोसावी, वनरक्षक साखरपा सहयोग कराडे, वनरक्षक फुणगूस आकाश कडुकर, वनरक्षक आरवली सुरज तेली, वनरक्षक दाभोळे सुप्रिया काळे, प्राणी मित्र अनुराग आखाडे यांनी केली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले.










