
चिपळूण : कोकणातील ज्येष्ठ पत्रकार, संपादक व लेखक सतीश कदम लिखित व संपादित ‘शब्द नव्हे, शस्त्र’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.गेली सुमारे ३५ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या सतीश कदम यांनी महाराष्ट्रातील दैनिक सागर, दैनिक सकाळ, दैनिक पुढारी, दैनिक तरुण भारत यांसह विविध नामांकित वृत्तपत्रांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले आहे. तसेच हिंदी राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांमध्ये न्यूज ब्युरो चीफ व आवृत्ती संपादक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
गेली २५ वर्षे ते स्वतःच्या ‘साप्ताहिक कोकण एक्सप्रेस’चे संपादक म्हणून कार्यरत आहेत. दैनिक तरुण भारतमध्ये संपादकीय प्रमुख म्हणून काम करत असताना त्यांनी ‘वाशिष्ठीच्या काठावरून’ हे सदर अनेक वर्षे लिहिले. हे सदर वाचकप्रिय ठरले. त्यानंतर ‘साप्ताहिक कोकण एक्सप्रेस’मधून संपादक म्हणून काम करताना त्यांनी राज्यपातळीपासून स्थानिक विषयांपर्यंत विविध प्रश्नांवर अनेक अग्रलेख लिहिले.या अग्रलेखांपैकी गेल्या दहा वर्षांतील निवडक अग्रलेखांचे संकलन ‘शब्द नव्हे, शस्त्र’ या ३०३ पानी पुस्तकात करण्यात आले असून, पुणे येथील संस्कृती प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शेखर निकम, आमदार प्रमोद जठार, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रमेश कदम, प्रसिद्ध कादंबरीकार व लेखक तानाजीराव चोरगे, प्रसिद्ध साहित्यिक प्रकाश देशपांडे, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, संस्कृती प्रकाशन, पुणेच्या प्रकाशक सुनीताराजे पवार आणि ब्राईट ओरिजिन मीडिया प्रा. लि.चे संचालक शेखर जैन यांच्यासह विशेष अतिथी म्हणून दैनिक सागरच्या संपादक शुभदा जोशी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला शहरातील नगरसेवक तसेच साहित्य, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. एनडीटीव्ही मराठी वृत्तवाहिनीच्या निवेदिका व मुक्त लेखिका ऋतुजा कदम उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी, पत्रकार, वाचक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘कोकण एक्सप्रेस’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.










