
देवगड : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दीपावली पाडव्याच्या मंगलमय पर्वावर हजारो दिव्यांच्या प्रकाशात सागरकिनारा उजळून निघणार आहे. समुद्राच्या लाटांचा नाद, मंदिर परिसरातील दीपमाळांची रोषणाई आणि असंख्य पणत्यांच्या प्रकाशाने कुणकेश्वरचा परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.
श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ कुणकेश्वर यांच्यावतीने मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून या भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या दीपोत्सवात पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धा, रंगावली कला प्रदर्शन, सुगम संगीत, पालखी प्रदक्षिणा आणि दीपप्रज्वलन अशा विविध कार्यक्रमांची पर्वणी भाविकांना अनुभवता येणार आहे.
दीपोत्सवानिमित्त मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने सजविण्यात येणार असून, पारंपरिक दिव्यांच्या प्रकाशात श्री कुणकेश्वर मंदिराचे विलोभनीय रूप अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर हजारो दिव्यांची आरास साकारली जाणार असल्याने दीपावली पाडव्याच्या रात्री कुणकेश्वरचा सागरकिनारा प्रकाशाने उजळून निघणार आहे. भक्ती, कला, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम साधणारा हा दीपोत्सव यंदाही आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धा २०२६. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आकाशकंदील बांबू, कागद, कापड, सुतळी किंवा टिकाऊ वस्तूंपासून तयार केलेला असणे बंधनकारक आहे. प्लास्टिक, थर्माकोल किंवा रेडिमेड चायनीज साहित्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
आकाशकंदील घरगुती व स्वतः तयार केलेला असावा, तसेच त्याची उंची किमान दोन फूट असणे आवश्यक आहे. सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकाला ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ३ हजार रुपये, तृतीय क्रमांकाला १ हजार ५०० रुपये, तर चतुर्थ क्रमांकाला १ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नावनोंदणीची अंतिम तारीख ९ नोव्हेंबर २०२६ असून, तयार केलेले आकाशकंदील श्री कुणकेश्वर मंदिर येथे जमा करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी सचिव हेमंत वातकर (७४९९१९९३९३) आणि विश्वस्त महेश जोईल (८२७५४६०२११) यांच्याशी संपर्क साधावा.
दीपोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत होणाऱ्या सुगम संगीताच्या स्वर आनंदघन होणार आहे. मान्यता कुंटे, हर्ष मेस्त्री आणि साक्षी मांजरेकर हे गायक आपल्या सुमधुर गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. सायंकाळी ६.३० ते ७ या वेळेत पालखी प्रदक्षिणा होणार असून, ७.३० वाजता दीपप्रज्वलनाने दीपोत्सवाचा मुख्य सोहळा अधिक मंगलमय होणार आहे. रात्री ८.३० ते ९ या वेळेत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता निलेश गुरव करणार आहेत.
या सोहळ्याला श्री स्वर आनंदधन संगीत मैफिलीचीही जोड लाभणार आहे. प्रफुल्ल मेस्त्री, गंधार कदम, सार्थक जामदार, हर्षद खुराडे आणि युवराज कुर्लेकर हे कलाकार आपल्या संगीतकलेतून कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहेत. दीपमाळांची आरास, हजारो पणत्यांचा लखलखाट, समुद्राच्या लाटांची पार्श्वभूमी आणि संगीताचे सुरेल स्वर अशा वातावरणात कुणकेश्वरचा दीपोत्सव भाविकांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे.
दीपावली पाडव्याच्या निमित्ताने साजरा होणारा हा दीपोत्सव म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई नसून कुणकेश्वरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव आहे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक आकाशकंदिलांच्या माध्यमातून निसर्गसंवर्धनाचा विचारही रुजविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाविक, ग्रामस्थ, पर्यटक आणि स्पर्धकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दीपोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








