
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील गावराई-सुकळवाड येथील सरस्वती विद्यामंदिर शाळा बंद असल्याबाबत प्रसारित होत असलेली माहिती वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा यशवंत एज्युकेशन अँड व्हिलेज अपलिफ्ट सोसायटीने केला आहे. याबाबत संस्थेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
संस्थेच्या म्हणण्यानुसार, इयत्ता 8 वी ते 10 वीचे वर्ग जून 2026 पासून नियमित सुरू असून विद्यार्थ्यांचे अध्यापन सुरू आहे. वर्गांसाठी शिक्षक कार्यरत असून उपस्थिती नोंदी व आवश्यक अभिलेख शाळेत उपलब्ध आहेत. शाळा बंद असल्याचा आभास निर्माण करून चुकीची माहिती प्रसारित करण्यात आल्याचा आरोपही संस्थेने केला आहे.
काही शिक्षकांना देण्यात आलेल्या नोटिसा या शाळा बंद करण्यासाठी नसून प्रशासकीय प्रक्रियेचा भाग असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. तसेच, शाळेतील कार्यालय व वर्गखोल्यांना कुलूप लावल्याच्या आरोपांचे खंडन करत, आवश्यकतेनुसार खोल्या उघडणे अथवा बंद करणे ही नियमित प्रशासकीय कार्यपद्धती असल्याचे म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणामागे काही व्यक्तींनी पूर्वनियोजित पद्धतीने आंदोलन व गैरसमज निर्माण केल्याचा आरोप संस्थेने केला असून, विद्यार्थी व पालकांनी अफवा आणि समाजमाध्यमांवरील अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. संस्थेने कायद्याच्या चौकटीत राहून विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, अशी ग्वाहीही दिली आहे.












