
कणकवली : तालुक्यातील सावडाव धबधबा ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर पर्यटन कराच्या मुद्द्यावरून राधानगरी दाजीपूर आणि इचलकरंजी येथील पर्यटक आणि स्थानिकांमध्ये वादंग झाला. यात पर्यटकांनी कर वसूली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तर स्थानिकांवरही दगड भिरकावले. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी इतर पर्यटक पळून गेले तर तेथे सापडलेल्या एका पर्यटकाला ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.सावडाव धबधबा पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांकडून सावडाव ग्रामपंचायतीतर्फे प्रत्येक व्यक्तीमागे दहा रूपये पर्यटन कराची आकारणी केली जाते. ही कर वसुली सावडाव ओटव रस्त्यावर केली जाते. तेथून सावडाव धबधबा अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे. इचलकरंजी आणि दाजीपूर येथून आलेल्या १० ते १२ पर्यटकांनी कर वसूलीच्या मुद्द्यावरून तेथील ग्रामपंचायत वसूली कर्मचाऱ्यांशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दाजीपूर आणि इचलकरंजीच्या पर्यटकांनी कर वसूली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. हा प्रकार पाहून स्थानिक ग्रामस्थ तेथे दाखल झाले. यावेळी या ग्रामस्थांवरही पर्यटकांनी दगड भिरकावले. हा प्रकार समजताच आणखी ग्रामस्थ तेथे दाखल झाले. ते पाहून पर्यटकांनी आपल्या वाहनांसह तेथून मुंबई गोवा महामार्गाच्या दिशेने पळ काढला. या घटनेत इतर पर्यटक पळून गेले असले, तरी ग्रामस्थांनी एका पर्यटकाला जागीच पकडून ठेवले होते. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. घटना घडल्यानंतर पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांच्या ताब्यातील पर्यटकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या सर्व पर्यटकांवर कणकवली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला पर्यटनाच्या नावाखाली येऊन स्थानिक नागरिकांवर दादागिरी करणाऱ्या अशा हुल्लडबाजांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सावडाव ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली.











