
कुडाळ : वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी, पणदूरतिठा येथे इयत्ता १० वी (एस.एस.सी.) व इयत्ता १२ वी (एच.एस.सी.) परीक्षेत विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सचिव नागेंद्र परब यांनी प्रास्ताविक करून संस्थेची शैक्षणिक वाटचाल, गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यामागील उद्देश आणि विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत सर्वांगीण विकास साधावा, याविषयी मार्गदर्शन केले.
यानंतर प्रमुख पाहुणे रुपेश कानडे (जिल्हा परिषद सदस्य, माणगांव) यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाचे कौतुक करत सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि उच्च ध्येय बाळगून भविष्यातही यशाची परंपरा कायम राखण्याचे आवाहन केले. तसेच शाळा व संस्थेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे, आधुनिक शैक्षणिक सुविधांचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या कार्याचे विशेष कौतुक करून समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करावे, असे प्रेरणादायी आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष रघुनाथ गावडे, उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर, सचिव नागेंद्र परब, संस्थेचे संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद ग. कर्पे, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात इयत्ता १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उत्कृष्टतेची प्रेरणा निर्माण झाली असून उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. सूत्रसंचालन शिक्षकांनी केले, तर उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.










