LIVE UPDATES

तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 23, 2026 17:36 PM
views 37  views

दोडामार्ग : तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अती पर्जन्यवृष्टीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी १०५.६४ मी. इतकी झाली असून  शुक्रवार (आज)पासून खळग्यातील दगडी धरणाच्या सांडव्यावरून पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

 दोडामार्ग तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील मुख्य व मोठे असलेल्या तिलारी धरणातील पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. मुसळधार पावसामुळे धरणाच्या सभोवताली असलेल्या डोंगरातून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात जमा होत आहे. तिलारी धरणाची पूर्ण जलसंचय पाणी पातळी ११३.२० मी आहे. तर धरणाची सांडवा माथा पातळी १०६.७० मीटर झाल्यास पाण्याचा विसर्ग सुरू होतो.

  गुरूवारी सकाळी पाणी पातळी १०५.६४ मी. झाली होती व धरण ७४.५० टक्के भरले होते. त्यामुळे शुक्रवारी (आज) पासून विसर्ग सुरू होणार आहे. हा विसर्ग खळग्यातील दगडी धरणाच्या सांडव्यावरून पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीला सोडण्यात येणार आहे. खराडी नदीचे पाणी व धरणाचे पाणी तिलारी नदीला मिळत असल्याने या नदीपात्रातील पाण्यात कमालीची वाढ होणार आहे. त्यामुळे  नदीकाठच्या असलेल्या कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, आवाडे, मणेरी, कुडासे, साटेली-भेडशी या गावांसहीत गोवा राज्यातील पेडणे तालुक्यातील इब्रामपूर-हणखणे, चांदेल, हसापूर, कासरवर्णे, वारखंड गावातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी नदीपात्रातून ये-जा करू नये. कपडे धुण्यासाठी नदीपात्रात उतरू नये. पाळीव गुरांना नदीपात्रात सोडू नये. तसेच गावांत दवंडी पिटवून सतर्क राहण्याचे आवाहन तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.