
वेंगुर्ला : तालुक्यातील उभादांडा (सागरेश्वर) येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) जागेतील प्रकल्पाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्यात यावी तसेच नवीन पर्यटन प्रकल्प उभारण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा गावातील सागरेश्वर परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्या जागेवर पर्यटन विकासासाठी प्रकल्प राबविण्यात आला होता. परंतु सद्यस्थितीत संबंधित प्रकल्प अस्तित्वात नसल्याचे दिसून येत असून, त्या प्रकल्पासाठी खर्च करण्यात आलेल्या निधीचा कोणताही ठोस परिणाम किंवा लाभ स्थानिक नागरिक व पर्यटकांना झालेला नाही.वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील सागरेश्वर परिसर हा नैसर्गिक, धार्मिक व पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून, दरवर्षी हजारो पर्यटक व भाविक येथे भेट देतात. असे असताना या महत्त्वाच्या पर्यटनस्थळाचा अपेक्षित विकास झालेला नाही. यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झाला आहे का ? तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारची अनियमितता, निष्काळजीपणा किंवा गैरव्यवहार झाला आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
सदर चौकशीदरम्यान संबंधित प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, निधी मंजूरी, प्रत्यक्ष खर्च, कामाची अंमलबजावणी, गुणवत्ता, कंत्राट प्रक्रिया आणि प्रकल्पाची पर्यटन सद्यस्थिती यांची स्वतंत्र तपासणी करण्यात यावी. तसेच दोषी अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच उभादांडा (सागरेश्वर) येथील एमटीडीसीच्या जागेवर आधुनिक व पर्यावरणपूरक पर्यटन प्रकल्प उभारण्यात यावा. या प्रकल्पामध्ये पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, स्वच्छतागृहे, वाहनतळ, माहिती केंद्र, सुशोभीकरण, पायी फिरण्यासाठी मार्ग, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, तसेच स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या पर्यटन सुविधांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संबंधित प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या व खर्च झालेल्या निधीचे विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे.एमटीडीसीच्या संबंधित जागेवर नवीन, सर्व सुविधायुक्त व पर्यावरणपूरक पर्यटन प्रकल्प तातडीने मंजूर करून उभारण्यात यावा. स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग घेऊन उभादांडा (सागरेश्वर) परिसराचा दीर्घकालीन पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात यावा, आदी मागण्या या निवेदनाद्वारे माजी आमदार राजन तेली यांनी केल्या आहेत.










