
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याच्या मत्स्य विभागात २५४ सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क पदांची भरती केली जाणार आहे. ही पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) राबविण्यात येणार आहे. या पदभरतीमुळे राज्यातील 254 मत्स्यविज्ञान पदवीधरांना शासकीय सेवेत प्रवेश करता येणार आहे. तसेच या निर्णयामुळे राज्याचा मत्स्यव्यवसाय विभाग अधिक सक्षम करण्यासाठी मदत होणार आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मत्स्य विभागातील भरतीच्या निर्णयामुळे राज्यात युवकांना रोजगाराज्या संधी उपलब्ध होणार आहेत. नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर मत्स्य विभागाचे कामकाज अधिक गतिमान आणि परिणामकार तसेच लोकाभिमुख होणार असून मत्स्यव्यवसायाशी संबधितांना अधिक सक्षम सेवा देण्यासाठी मदत होणार आहे.
मत्स्य विभागाच्या इतिहासात प्रथमच नवीन आकृतीबंधाची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने विभागाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होणार आहे. मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध योजना, मत्स्य संवर्धन, किनारपट्टी भागातील विकासकामे आणि मत्स्यव्यवसायिकांना तांत्रिक मार्गदर्शन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) गट-क पदाकरीता एकूण २५४ जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवाराकडे मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत.














