LIVE UPDATES

मराठी शाळांसाठी चांगली बातमी

पहिलीत ४,७५७ विद्यार्थ्यांचा प्रवेश | जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा वाढता कल
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 15, 2026 20:23 PM
views 15  views

सिंधुदुर्गनगरी :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांवरील पालकांचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत असल्याचे यंदाच्या शाळा प्रवेश प्रक्रियेतून स्पष्ट झाले आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी तब्बल ४ हजार ७५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, गतवर्षीच्या तुलनेत शासकीय शिक्षण व्यवस्थेकडे पालकांचा वाढता कल दिसून येत आहे. जिल्ह्यात यंदा पहिलीत प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची एकूण संख्या ५ हजार १४७ इतकी आहे. त्यापैकी २ हजार ४६२ मुले आणि २ हजार २९५ मुली, असे एकूण ४ हजार ७५७ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल झाले आहेत. अद्याप ३९० विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर असून, त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी खासगी शाळांचा पर्याय निवडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण, फुलांच्या वर्षावातून स्वागत, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे प्रवेशोत्सव खऱ्या अर्थाने शिक्षणाचा उत्सव ठरला.

तालुकानिहाय प्रवेश संख्या पाहता कुडाळ तालुका अव्वल ठरला असून तेथे १ हजार ५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. याशिवाय कणकवली तालुक्यात ८३७, सावंतवाडीमध्ये ७६७, देवगडमध्ये ५९६, मालवणमध्ये ५४८, वेंगुर्ल्यात ४०१, दोडामार्गमध्ये २८२ तर वैभववाडीत २७१ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.

गतवर्षी जिल्ह्यात पहिलीत प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची संख्या ६ हजार २८४ इतकी होती. त्यापैकी ४ हजार ४२० विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये, तर १ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतला होता. यंदा शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश नोंदविले गेल्याने शासकीय शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्ता, सुविधा आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांना पालकांकडून मिळणारा प्रतिसाद अधोरेखित झाला आहे.

जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी सांगितले की, उर्वरित ३९० विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्याची शक्यता आहे. मात्र, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांची निवड करावी यासाठी शिक्षण विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

ते पुढे म्हणाले, "जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रशिक्षित शिक्षक, विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे पालकांचा प्रतिसाद वाढत आहे. आगामी काळात हा विश्वास आणखी दृढ करण्यासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध आहे."

शासकीय शिक्षणाची बदलती प्रतिमा, गुणवत्तेचा सातत्याने उंचावणारा आलेख आणि पालकांचा वाढता विश्वास यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम पर्याय ठरत असल्याचे या प्रवेश प्रक्रियेतून अधोरेखित झाले आहे.