
सावंतवाडी : उप जिल्हा रुग्णालयात आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह येण्याच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी 10 डॉक्टरांनी राजीनाम्याची नोटीस वैद्यकीय अधीक्षकांकडे दिली आहे. एका महिन्याची आगावू नोटीस त्यांनी दिली आहे. त्यामुळे आरोग्य सचिव, उप महासंचालकांच्या दौऱ्यानंतर परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा असताना ती आणखीनही बिघडणार असल्याचे चित्र आहे. याला वैद्यकीय अधिक्षकांनी दुजोरा दिला आहे.
11 महिन्यांच्या कंत्राटी सेवेत असणारे हे डॉक्टर पुढील महिन्यात दिसणार नाहीत. त्यात दोन वैद्यकीय अधिकारी राजीनाम्याच्या तयारीत असून दोघे सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहेत. तर दोघे 10 वर्ष बोर्डवरच दिसत आहे. त्यामुळे केवळ तिघांच्या जीवावर हे रूग्णालय चालणार असून पूर्णवेळ 20 वैद्यकीय अधिकारी असणं आवश्यक आहे. मात्र, सध्या सात जणच हा कारभार सांभाळत आहेत. वैद्यकीय अधिक्षक पद देखील रिक्त असून प्रभारी कारभार सांभाळत आहेत. त्यात मदतीला असणारे कंत्राटी राजीनामा देऊन बसलेत. ऑन कॉल असणारे एन.एच.एम खालील डॉक्टर सध्यातरी कायम आहेत. मात्र, ते खासगी रूग्णालयात सेवा देत असल्याने त्यांचीही शाश्वती देता येत नाही. त्यामुळे रिक्तपदे 'जैसे थे' राहण्याची शक्यता आहे. एकीकडे यासाठी जनहित याचिका दाखल आहे. कोल्हापूर खंडपीठात ताशेरे ओढले जात आहेत. तर दुसरीकडे मात्र, डॉक्टर सोडून जाण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे यंत्रणेवर प्रचंड ताण येणार असून महाराष्ट्र शासन कुचकामी ठरताना दिसत आहे.
नियुक्ती करण्यात आलेले डॉक्टर हजर होत नसून शासन आदेशाला ते जुमानत देखील नाही आहेत. त्यात आता कंत्राटी डॉक्टरांनी देखील राजीनामा दिल्याने रुग्णसेवेत खंड पडणार आहे. जिल्हा रूग्णालय परिस्थिती यापेक्षा बिकट असल्याने भुमिपूत्र ''गोवा बांबोळी पे निर्भर'' अशी परिस्थिती राहणार आहे. यात सर्वसामान्य, गोरगरीब जनता भरडली जाणार असून राज्यकर्त्यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.












