LIVE UPDATES

वाडा इथं अज्ञाताने फाडले महापुरुषांचे बॅनर

अज्ञाताविरोधात देवगड पोलिसांत गुन्हा दाखल
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 24, 2026 11:45 AM
views 160  views

देवगड : देवगड तालुक्यातील वाडा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे लावण्यात आलेले महापुरुषांच्या अभिवादनाचे बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे तेथील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सदर घटनेचा निषेध व्यक्त करीत बौद्ध समाजाच्या भावना दुखावण्याच्या तसेच परिसरातील शांतता भंग करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप तेथील समाजबांधवांनी करीत संशयिताविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली. देवगड पोलिसांनी घटनास्थळी जात तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात ठेवली. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात संशयिताविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये तेथील 'मिलिंदवाडी'च्यावतीने नामफलकाच्या स्तंभाच्या पाठीमागे डॉ. आंबेडकर जयंती व बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने डॉ. आंबेडकर व भगवान गौतम बुद्धांचा फोटो असलेले बॅनर लावण्यात आले होते.

रविवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पांडुरंग कानोजी वाडेकर (७१, रा. वाडा मिलिंदवाडी) यांना डॉ. आंबेडकर चौकातील नामफलकाच्या स्तंभाच्या पाठीमागील डॉ. आंबेडकर जयंती व गौतम बुद्ध पौर्णिमेचा एकावर एक लावलेला बॅनर फाटलेल्या अवस्थेत दिसला. सदर नामफलकाच्या स्तंभाच्या बाजूस असलेल्या बसस्टॉपच्या वरील बाजूस 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक एसटी स्टॉप' असे लिहिलेला व डॉ. आंबेडकर यांचा फोटो असलेला बॅनर, तसेच विकास चव्हाण (रा. पुरळ) यांच्या केशकर्तनालयाच्या समोर असलेला 'मिलिंदवाडी' असे लिहिलेला बॅनरदेखील अज्ञात व्यक्तीने फाडल्याचे निदर्शनास आले. याची माहिती त्यांनी तात्काळ वाडीचे सचिव जयवंत शांताराम वाडेकर, कोषाध्यक्ष नकुल सजनाजी वाडेकर यांच्यासह पोलीस पाटील महेंद्र मांजरेकर, सरपंच सुनील जाधव यांना दिली. या घटनेचे वृत्त परिसरात पसरताच परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस निरीक्षक शाम बुवा हे तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून घटनेतील सदर बॅनर जप्त केले. फॉरेन्सिक टीमसह ठसेतज्ज्ञ, श्वानपथकालाही घटनास्थळी पाचारण करून घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला. या घटनेची फिर्याद पांडुरंग वाडेकर यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून अज्ञात संशयिताविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पंचनामा झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने सदर जुने फलक (बॅनर) सन्मानपूर्वक खाली उतरवून ताब्यात घेतले. पोलिसांनी नवा बॅनर उपलब्ध करून देत अनोखी सामाजिक बांधिलकी जपली. पोलिसांच्या बंदोबस्तातच तेथील समाज बांधवांनी नवा बॅनर तेथे लावला. दरम्यान, सदर घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींवर कडक कारवाई व्हावी, या मागणीसाठी २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता वाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, हितचिंतक, महिला व अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्थानिक संयोजकांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले या महापुरुषांचे कार्य केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण देशासाठी आहे. त्यामुळे या अस्मितेचे रक्षण करणे हे प्रत्येक जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे. समाज कितीही छोटा असला, तरी अन्यायाविरुद्ध सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले जाईल. तथापि, पोलिसांनी तपासात दिरंगाई केली किंवा योग्य न्याय दिला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विश्वनाथ पडेलकर, राजेश साळसकर, समीर शिरगावकर यांनी दिला. डी. के. पडेलकर म्हणाले, वाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा आंबेडकरी जनतेसाठी अत्यंत पवित्र आणि मानाचा बिंदू आहे. सन १९५८ मध्ये या ऐतिहासिक भूमीवर धम्मदीक्षेचा जाहीर कार्यक्रम झाला होता.

या चौकामध्ये महापुरुषांना अभिवादन करणारे डिजिटल बोर्ड नेहमी लावले जातात. मात्र, रात्रीच्या सुमारास काही समाजकंटकांनी या फलकाची विटंबना करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा देत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी जि. प. सदस्य देवदत्त कदम, दिलीप कदम, के. एस. कदम, अनिल पुरळकर, सुरभी पुरळकर, संतोष तळवडेकर, सुहास मिठबावकर, सुनील जाधव, विजय कदम, रत्नदीप कांबळे आदी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून तेथील परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अज्ञात संशयिताचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनीही देवगड येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली.