LIVE UPDATES

स्मार्ट मीटर, वाढीव वीजबिलांवरून किनळोस ग्रामस्थांचा महावितरणला घेराव

ओरोस उपकार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या; १५ दिवसांत पडताळणी करून योग्य त्या कारवाईचे आश्वासन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 14, 2026 17:34 PM
views 210  views

सिंधुदुर्गनगरी : किनळोस गावात बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे भरमसाठ वीजबिले येत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मंगळवारी महावितरणच्या ओरोस येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. उपकार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. अखेर वाढीव वीजबिलांची पडताळणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले.

 किनळोस येथील संजय सावंत, सखाराम परब, प्रकाश परब, रविकांत सावंत, मधुकर सावंत, बाळकृष्ण गावडे, अक्षय साटम, सदानंद ठुबरे, राजेंद्र सावंत, अमृत बागवे, वासुदेव सावंत यांच्यासह सुमारे ३० ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेतला.

 यावेळी शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष तथा स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने स्मार्ट मीटर, वाढीव वीजबिले आणि अन्य समस्यांबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर भूमिका मांडली. गावात अनेक ग्राहकांना वाढीव वीजबिले मिळाल्याच्या तक्रारी असून त्याची तातडीने दखल घेण्याची मागणी त्यांनी केली.

 यावर उपकार्यकारी अभियंता राजेंद्र कामथे यांनी प्रत्येक वीजजोडणीची पाच दिवसांचा वीजभार (लोड) डाटा तपासून पुढील १५ दिवसांत पडताळणी केली जाईल, तसेच पडताळणीत वाढीव वीजबिले आढळल्यास आवश्यक ती दुरुस्ती करून दिलासा दिला जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

 याशिवाय ग्रामस्थांनी गावातील जीर्ण झालेले वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांचा प्रश्नही उपस्थित केला. त्यानुसार पणदूरचे कनिष्ठ अभियंता पाटील यांना संबंधित ठिकाणी पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.