
वेंगुर्ला : केळुस सरपंच योगेश शेटये यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. १२ मे रोजी वेंगुर्ला तालुकाप्रमुख यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण आले असून यानंतर त्यांची नेमकी काय भूमिका असेल याकडे लक्ष लागून राहिले आहे.
योगेश शेटये यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, मी, श्री. योगेश कृष्णा शेटये, मु. केळूस, ता. वेंगुर्ला, या पत्राद्वारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माझ्या 'सभासद' पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे. मी आजवर पक्षाचा सभासद म्हणून प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केले आहेत. मात्र, सध्या माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे आणि व्मुयस्ळेथ मला पक्षाच्या कार्यासाठी पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही आहे. पक्षाच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये आणि माझ्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडता येत नसल्याने, मी स्वखुशीने या पदाचा राजीनामा देत आहे. तरी माझा हा राजीनामा त्वरित मंजूर करावा, ही नम्र विनंती. आजवर मला मिळालेल्या सहकार्याबद्दल मी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आभारी आहे. असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
नुकताच केळुस येथील सर्वात मोठ्या बंधाऱ्यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी देण्यात आला होता. यामुळे केळुस येथील गेली कित्येक वर्षे जो प्रलंबित प्रश्न मार्गी लागला होता. यामुळे आता पुढील काळात पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली सरपंच शेटये भाजप पक्षात प्रवेश करणार का ? हे सुद्धा पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.












