
कणकवली : गडनदी पात्रातील केटी बंधाऱ्यांमध्ये प्लेटस घालून पाणी अडविण्यासाठी लघू पाटबंधारे विभागाकडून कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराला २५ लाख रुपये दिले जाणार आहेत. मात्र, केटी बंधाऱ्यांवर प्लेटस घालण्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. परिणामी बंधाऱ्यांमधून पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला अधिकाऱ्यांनी पाठिशी न घातला जोपर्यंत केटी बंधाऱ्यांमध्ये पाणी साचणार नाही, तोपर्यंत या कामाचे बिल काढू नये, अशी आग्रही मागणी लक्ष्मण गावडे यांनी केली. तसेच रस्त्यालगत वृक्ष लागवडीचे काम शून्य टक्के झाले आहे. मात्र, वृक्ष लागवडीचे काम घेतलेल्या ठेकेदाराला ३ लाखाचे पेमेंट देण्यात आले हा गंभीर प्रकार गावडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.
कणकवली पंचायत समितीची सभा सभापती हर्षदा वाळके यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या प. पू. भालचंद्र सभागृहात शुक्रवार २० नोव्हेंबरला पार पडली. यावेळी उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, लक्ष्मण गावडे, पवन भालेकर, सहदेव उर्फ अण्णा खाडये, गुरुप्रसाद शिदे, दिव्या पेडणेकर, राजश्री पवार, सायली कृपाळ, अक्षता राणे, मानसी मराठे यांच्यासह पंचायत समितीसदस्य व अधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यावर यंदा दुष्काळाचे सावट आहे. जिल्ह्यात पाणी अडविण्यासाठी लोकसहभागातून वनराई व कच्चे बंधारे उभारले जात आहेत. तसेच कणकवली तालुक्यातील गडनदीपात्रातील केटी बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यासाठी लघू पाठबंधारे विभागातर्फे बंधाऱ्यांवर प्लेटस् घालण्यासाठी २५ लाखांचे काम काढण्यात आले. या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून प्लेटस बसविण्याचे काम निकृष्ट दर्जा केले जात आहे. परिणामी बंधाऱ्यांना गळती लागली आहे, ही बाब गावडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत यावरून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होत नाही, तोपर्यंत ठेकेदाराला बिल अदा करण्यात येऊ नये, अशी सूचना त्यांनी केली.
कासार्डे परिसरात मोबाईल टॉवर प्रश्नाबाबत सहदेव खाडये यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. डामरे-तिवरे गावातून एसटी बस जात नाही. त्याचा फटका विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना बसत आहे, ही बाब मानसी मराठे यांनी सांगितली. महामार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेत पाळीवसह वन्यप्राणी मृत्युमुखी पडत आहेत. हायवेच्या देखभाल दुरुस्तीचे काम असलेल्या ठेकेदाराकडून मृत जनावरांची वेळीत उचल होत नसल्याने हायवेलगतच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे वाहन अपघातात मृत पावलेल्या जनावरांचे त्या ठिकाणाहून उचलून त्याची विल्हेवाट लावावी, अशी सूचना गावडे यांनी केली.
कुर्ली-घोणसरी गावात वस्तीची गाडी ठेवण्यात यावी, अशी मागणी मानसी मराठे यांनी केली. खारेपाटण परिसरात पोलिसांच्या आशीवार्दाने अवैध धंदे पुन्हा सुरू झाले आहे. अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करून हे धंदे कायमस्वरुपी बंद करावेत, अशी मागणी गुरुप्रसाद शिंदे यांनी केली.
गावांमधील ग्रा.पं.कडे वर्ग झालेल्या प्लॉटस ग्रा. प. प्रशासानने त्वरित हस्तांतरण करून घ्यावेत. शिरवल-हळवल गावासह अन्य रस्त्यांलगत वाढलेली झाडीझुडपे तोडून रस्ते निर्धोक बनवावा, अशी सूचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना गावडे यांनी केली.
देवगड, कणकवली तालुक्यात एमआयडीसी होण्याबाबत प्रस्ताव शासनाला सादर करण्याचा ठराव घेण्यात आला. दुष्काळ परिस्थिती पाणी टंचाई उदभवू नये याकरिता जेईंनी चांगले काम केल्याबद्दल सोनू सावंत यांनी त्यांचे कौतुक केले. दिगवळे गावासाठी मंजूर झालेल्या नळयोजनेचे काम केव्हा सुरू होणार, असा सवाल राजश्री पवार यांनी केला. हुबंरट येथील एका खासगी शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिक्षण संस्थेकडून आवश्यक असलेले कागदपत्रे दिली जात नाहीत, परिणामी त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे, त्यामुळे शिक्षण विभागाने याप्रश्नी लक्ष घालून त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी सूचना गावडे यांनी केली.
बैठकीत आरोग्य, लेखा, शिक्षण, एसटी विभागाचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण पाणीपुरवठा विभागा अंतर्गत तालुक्यात सुरु कामांचा पूर्ण व अपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला. कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना जास्त पटसंख्या असलेल्या शाळांवर रुजू करण्यात यावे, अशी सूचना सोनू सावंत यांनी गटशिक्षण अधिकारी किशोर गवस यांना केली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पंचायत समिती सदस्यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न व समस्या मांडून त्या मार्गी लावण्याची विनंती अधिकाऱ्यांनी केली.
सभापतींनी टोलचे अधिकऱ्यांचे कान
कणकवली पंचायत समितीच्या सभांमध्ये सदस्यांकडून मागील सभांमध्ये सूचना, प्रश्न, समस्याबाबत आवाज उठविला जात आहे. ही बाब शोभनिय नाही. त्यामुळे अधिकऱ्यांनी मासिक बैठकांमध्ये सदस्यांकडून उपस्थित केलेले जाणारे प्रश्न, समस्या, सूचनांचा निपटार करावा, अशा शब्दांत सभापती हर्षदा वाळके यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले. तसेच पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा सोमवार २३ नोव्हेंबरला वधार्पन दिन आहे. वर्धादिन सोहळ्याला पं.स. सदस्यांसह नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन हर्षदा वाळके यांनी केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








