
कणकवली : दिवाळीच्या काळात मिठाई, फराळ आणि इतर खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असताना कणकवली शहरातील काही बेकरी व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईत शहरातील काही नामांकित बेकरी व्यावसायिकांचाही समावेश असल्याची चर्चा सुरू असून नेमके कोणत्या व्यावसायिकांवर कारवाई झाली, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी ही विशेष कारवाई केली असल्याचे सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांनी सांगितले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना भेसळमुक्त आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. कणकवली मधील या कारवाईदरम्यान खवा ६ किलो (किंमत २ हजार १४५ रुपये), पोहा चिवडा ३ किलो आणि शेव चिवडा ५ किलो असे एकूण ८ किलो चिवडा (किंमत २ हजार २४० रुपये) जप्त करण्यात आला. तसेच मोतीचूर लाडू, बुंदी लाडू, खवा-मावा, मिठाई आणि फरसाण अशा विविध खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या संशयास्पद अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत संबंधित विक्रेते अथवा उत्पादकांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त गायकवाड यांनी दिला आहे.
दिवाळीच्या खरेदीत नागरिकांनीही घ्यावी खबरदारी
दिवाळी सणात मिठाई, फराळ आणि बेकरी उत्पादनांची मागणी वाढते. अशा परिस्थितीत खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्राहकांनी परवानाधारक विक्रेत्यांकडूनच मिठाई व फराळ खरेदी करावा, खरेदीचे पक्के बिल घ्यावे, अनैसर्गिक गडद रंग असलेले पदार्थ टाळावेत तसेच खाद्यपदार्थांची उत्पादन तारीख आणि मुदत तपासावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.
खाद्यपदार्थांमध्ये भेसळ अथवा निकृष्ट दर्जा आढळल्यास नागरिकांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. आता प्रयोगशाळेच्या अहवालातून नेमके काय समोर येणार आणि कणकवलीतील संबंधित व्यावसायिकांवर कोणती कारवाई होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








