LIVE UPDATES

Ratnagiri Diwali Special ST Buses : दिवाळीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून २६ जादा फेऱ्या

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 07, 2026 06:39 PM
views 128  views
MSRTC Ratnagiri Division announces 26 additional daily bus services for passengers during the Diwali festival.

रत्नागिरी : दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने ६ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत दररोज २६ जादा बसफेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड, धुळे यांसह विविध शहरांसाठी या जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर महिला प्रवाशांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी कार्डची अट ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिल करण्यात आली आहे.

दिवाळीच्या काळात मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून कोकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. ही गर्दी लक्षात घेऊन दापोली, खेड, चिपळूण, देवरुख, रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि मंडणगड आगारांतून जादा बसफेऱ्या सोडण्यात येणार आहेत.

दापोलीहून छत्रपती संभाजीनगर व परळी, खेडहून चिंचवड, विरार, बोरीवली, नांदेड व बीड, तर चिपळूणहून पुणे, स्वारगेट, ठाणे, मुंबई आणि बोरीवलीसाठी जादा गाड्या धावणार आहेत. देवरुखहून स्वारगेट व नाशिक, रत्नागिरीहून पंढरपूर व पुणे, लांजाहून कोल्हापूर, धाराशिव व बोरीवली, राजापूरहून कोल्हापूर तसेच मंडणगडहून छत्रपती संभाजीनगर व बोरीवलीसाठी अतिरिक्त बससेवा उपलब्ध असेल.

या सर्व जादा फेऱ्यांचे संगणकीय आरक्षण सुरू झाले आहे. प्रवाशांना बसस्थानकातील आरक्षण खिडकी, अधिकृत खासगी एजंट किंवा एसटीच्या मोबाईल ॲपद्वारे आगाऊ तिकीट आरक्षित करता येणार आहे. प्रवाशांनी गर्दीच्या काळात गैरसोय टाळण्यासाठी आगाऊ आरक्षण करावे आणि जादा बसफेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी केले आहे.