LIVE UPDATES

Ratnagiri News : दुष्काळग्रस्त प्रत्येक बाधित शेतकऱ्याला मिळणार पूर्ण न्याय : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 07, 2026 06:33 PM
views 108  views
Uday Samant Announces Diwali Relief for Ratnagiri Farmers

रत्नागिरी : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना आणि हे वर्ष संकटाचे ठरले असताना, बळीराजाच्या घरातही सर्वांप्रमाणे आनंदात दिवाळी साजरी व्हावी हीच महायुती सरकारची भूमिका आहे. याच भावनेतून राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रथम मदत म्हणून प्रती शेतकरी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. २२ हजार ४९४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे ११ कोटी २५ लाख रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. असे सांगतानाच पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्ह्यातील तमाम जनतेला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र शासनाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना प्रथम मदत म्हणून ५ हजार रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील ३१ हजार २४८ शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ होणार आहे. यासाठी जिल्ह्यासाठी एकूण १५ कोटी ६२ लाख ४० हजार रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. यापैकी २२ हजार ४९४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे ११ कोटी २५ लाख रुपये आधीच थेट जमा करण्यात आले आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे उर्वरित ज्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे जमा झालेले नाहीत, त्यांचे पैसे तातडीने जमा करावेत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री म्हणून प्रशासनाला देण्यात आले आहेत.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरामध्येही ती साजरी झाली पाहिजे. यासाठी मी स्वतः ज्या ठिकाणी अतिशय मोठा दुष्काळ पडलेला आहे, त्या भागात जाऊन शेतकऱ्यांबरोबर दिवाळी साजरी करणार असून त्यांच्यासोबत फराळाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. सध्या दिलेली पाच हजार रुपयांची मदत ही प्राथमिक स्वरूपाची आहे, असे स्पष्ट करत त्यांनी पुढे सांगितले, "शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात महाराष्ट्र शासन १०० टक्के सहभागी आहे. प्राथमिक मदत दिली असली तरी पूर्ण नुकसानभरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यात दिले आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा वहिनी यांनी संपूर्ण राज्यभरात असे आदेश दिलेले आहेत.