
सिंधुदुर्ग : यावर्षीची दिवाळी खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक आणि हटके ठरवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धाकोरे येथील प्रयोगशील व्यक्ती सुनील मुळीक यांनी एक अत्यंत नावीन्यपूर्ण कलाकृती साकारली आहे. त्यांनी प्लास्टिक किंवा कागदाचा वापर न करता थेट सुपारीच्या पोवळ्यांपासून सुपारीच्या झाडाच्या नैसर्गिक आवरणापासून अत्यंत आकर्षक आणि सुंदर असा आकाशकंदील तयार केला आहे. परंपरा आणि पर्यावरण रक्षणाचा सुंदर संदेश देणाऱ्या या आकाशकंदिलाची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू असून सुनील मुळीक यांच्या या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्ह्यात सध्या पर्यावरणपूरक आकाशकंदीलांचा ट्रेन्ड आला आहे.
नैसर्गिक साधनांचा कल्पक वापर
दिवाळीच्या दिवसात घरादाराला सजवण्यासाठी विविध प्रकारच्या चायनीज आणि प्लास्टिकच्या आकाशकंदिलांची बाजारपेठेत रेलचेल असते. मात्र, यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो. यावर पर्यावरणपूरक पर्याय म्हणून सुनील मुळीक यांनी आपल्या परिसरातील उपलब्ध असलेल्या टाकाऊ व नैसर्गिक वस्तूंवर लक्ष केंद्रित केले. सुपारीच्या झाडापासून सहज उपलब्ध होणाऱ्या पोवळ्यांचा (खोपा/आवरण) कल्पक वापर करत त्यांनी हा नेत्रदीपक आकाशकंदील डिझाइन केला आहे. या आकाशकंदिलावरील सुबक रचना अनेकांना मोहीत करणारी आहे. सुपारीच्या पोवळ्यांपासून काय काय करता येते, याचे हे प्रत्यक्ष उदाहरण आहे.
सुनील मुळीक यांनी आपल्या हाताच्या कौशल्याने आणि कलाप्रेमातून ही अनोखी कलाकृती साकारून तरुणांसमोर एक उत्तम आदर्श ठेवला आहे. 'निसर्गाची हानी न करताही दिवाळी साजरी करता येते', हे त्यांनी यातून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे धाकोरे गावाच्या आणि संपूर्ण सिंधुदुर्गच्या कलागुणांमध्ये भर पडली असून, नागरिक त्यांच्या या कल्पकतेला भरभरून दाद देत आहेत. हा इको-फ्रेंडली आकाशकंदील पाहण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत असून, यंदाच्या दिवाळीत सुनील मुळीक यांची ही कलाकृती एक मोठे आकर्षण ठरणार यात शंका नाही.
यावर्षीच्या दिवाळीत आपल्या घरादाराला रोषणाई करताना थोडासा विचार करूया! बाजारात मिळणारे प्लास्टिकचे, चायनीज आणि पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या कंदिलांचा वापर टाळूया. आपल्याच निसर्गात सहज उपलब्ध असणाऱ्या टाकाऊ आणि नैसर्गिक वस्तूंमधून जसे की मी सुपारीच्या पोवळ्यांपासून हा आकाशकंदील तयार केला आहे तशीच एखादी आगळीवेगळी कलाकृती तुम्हीही घरच्या घरी बनवू शकता, असे मुळीक म्हणाले.








