LIVE UPDATES

सिलेंडर बुकिंगवरील २५ दिवसांची अट रद्द करा

पूर्वीप्रमाणे १५ सिलेंडर द्या | प्रांताधिकाऱ्यांना राजेंद्र पेडणेकर यांचं निवेदन
Edited by: उमेश बुचडे
Published on: June 08, 2026 21:00 PM
views 15  views

कणकवली : घरगुती गॅस सिलिंडर वितरणातील अडचणी दूर करून २५ दिवसांनंतरच बुकिंग करण्याची अट रद्द करावी तसेच पूर्वीप्रमाणे वर्षाला १५ सिलिंडर देण्याची व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी रविवारी (दि. ८) उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, घरगुती गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिलिंडरचे बुकिंग केल्यानंतरही घरपोच सेवा नेमकी कधी मिळेल याची खात्री नसते. घरपोच वितरणासाठी शुल्क भरूनही अनेक नागरिकांना गॅस एजन्सीच्या कार्यालयात जाऊन तासनतास रांगेत उभे राहून सिलिंडर घ्यावा लागत आहे. पूर्वी प्रत्येक गॅसधारकाला वर्षभरात १५ सिलिंडर मिळत होते. मात्र, नव्या नियमानुसार २५ दिवसांनंतरच पुढील बुकिंग करता येत असल्याने आवश्यक तेवढे सिलिंडर मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. बुकिंगनंतर टोकन क्रमांक मिळणे आणि वितरणासाठी आणखी काही दिवस लागणे यामुळे प्रत्यक्षात एक सिलिंडर मिळण्यासाठी ३० ते ४० दिवसांचा कालावधी लागत असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर असून काही ठिकाणी ४५ दिवसांनंतरच नवीन बुकिंगची परवानगी दिली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. घरगुती गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार केला जात असल्याचाही आरोप त्यांनी निवेदनातून केला. काळ्या बाजारात घरगुती सिलिंडर सुमारे २,२०० रुपये तर व्यावसायिक सिलिंडर ३,२०० रुपयांना विकले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनेकदा बुकिंग केल्यानंतरही नागरिकांना बुकिंग रद्द झाल्याचे संदेश येतात. त्यामुळे पुन्हा नव्याने बुकिंग करावे लागते आणि सामान्य नागरिकांसह कामगार वर्गालाही मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे हॉटेल व्यवसायावरही परिणाम होत असून खाद्यपदार्थांच्या दरात वाढ होत असल्याचे हॉटेल व्यावसायिकांकडून सांगितले जात असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. याचा थेट फटका ग्राहकांना बसत आहे. एका घरगुती सिलिंडरचा वापर साधारण २१ ते २२ दिवसांत होत असल्याने वर्षभरात किमान १५ सिलिंडरची आवश्यकता असते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे वर्षाला १५ सिलिंडर देण्याची व्यवस्था कायम ठेवून २५ दिवसांची बुकिंग अट तातडीने रद्द करावी, अशी मागणी पेडणेकर यांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच नागरिकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून या प्रश्नावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी विनंतीही त्यांनी केली.