
देवगड | प्रतिनिधी
पालकमंत्र्यांनी 'अणुऊर्जा प्रकल्पाचे पुस्तक आम्ही बंद करतो' असे जाहीर केले असले, तरी प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबतचा संभ्रम अद्याप कायम असल्याचा दावा आंबा, काजू बागायतदार व व्यापारी संघाचे अध्यक्ष काका ढोके यांनी केला. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात हा प्रकल्प कोकणातून रद्द झाल्याचे अधिकृत परिपत्रक काढण्यात यावे, तरच हा विषय कायमचा संपुष्टात येईल, अशी मागणी त्यांनी केली.
जलसमाधी आंदोलनात सहभागी झालेल्या सुमारे २५ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले, मात्र अणुऊर्जा प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोटरसायकल रॅली काढणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. ९ जुलैपर्यंत जमावबंदी आदेश लागू असताना कायदा केवळ शेतकऱ्यांनाच लागू होतो का, असा सवालही ढोके यांनी उपस्थित केला. शेतकरी हेही मतदार असून पोलिसांना योग्य निर्देश देऊन त्यांच्यावरील गुन्ह्यांबाबत न्याय्य भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.यावेळी किरण टेंबुलकर म्हणाले की, जलसमाधी आंदोलन हे कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून शेतकरी, बागायतदार आणि प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन होते. मात्र या आंदोलनाबाबत पालकमंत्र्यांना चुकीची माहिती दिली जात असून, स्थानिक पातळीवर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अणुऊर्जा प्रकल्पाबाबत प्रत्येक गावातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून जनतेची खरी भूमिका जाणून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
मुणगे, हिंदळे आणि कुणकेश्वर येथील विशेष ग्रामसभांमध्ये अणुऊर्जा प्रकल्पाला विरोधाचे ठराव मंजूर झाले असून, पुढील काळात तालुक्यातील प्रत्येक गावातून विरोधाचे ठराव घेतले जाणार असल्याचेही टेंबुलकर यांनी स्पष्ट केले.
बागायतदारांच्या आंदोलनापूर्वी बॅनरबाजी आणि त्यानंतर काढण्यात आलेल्या समर्थनार्थ मोटरसायकल रॅलीवरही त्यांनी टीका केली. या रॅलीत भाजप पदाधिकाऱ्यांची मुले तसेच रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रात आलेले युवक सहभागी होते. रॅलीमागे भाजपच्या चारचाकी गाड्याही होत्या. रोजगाराच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याच्या पार्श्वभूमीवर अशा रॅलींमुळे सत्ताधाऱ्यांचीच बदनामी होत असल्याचा आरोप टेंबुलकर यांनी केला.












