
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात सोमवारी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे साटेली-भेडशी परिसरात मोठे नुकसान झाले आहे. साटेली गावात झाड कोसळून तब्बल ८ ते ९ वीज खांब मोडले असून संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे गाव अंधारात बुडाले आहे.वीज खांब रस्त्यावर पडलेले असताना रात्रीच्या काळोखात एका व्यक्तीची त्यावर धडक बसली. या अपघातात ती व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तातडीने उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (बांबोळी) येथे हलविण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्याची आणि पडलेले खांब हटविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून दुरुस्तीचे काम हाती घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










