LIVE UPDATES

मणक्याच्या आजारांवर मोफत तपासणी - उपचार शिबीर

मुंबईतील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज करणार मार्गदर्शन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 24, 2026 18:43 PM
views 309  views

कुडाळ : बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट व बॅ. नाथ पै शिक्षण संस्था यांच्यावतीने 'फिजिओथेरपी क्लिनिक 'आरोग्यम' मध्ये मणक्याच्या आजारावरील उपचारासाठी  मोफत पूर्व तपासणी शिबिराचे ९ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्यांनतर ज्यांच्यावर पुढील उपचाराची आवश्यकता आहे, अशा गरजू रुग्णांना 11 जुलै रोजी ओरोस येथे होणाऱ्या  मणक्यासंबंधीच्या आजारांवर उपचार शिबीरात उपचारसाठी पाठविले जाणार आहे. 

ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 11 जुलै रोजी मुंबई येथील अनेक नामांकित हॉस्पिटलमध्ये मणक्यांच्या आजारावर सेवा देणारे तज्ञ डॉ. शेखर भोजराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या शिबिरातील रुग्णांवर उपचार व मार्गदर्शन केले जाणार आहे. डॉ. शेखर भोजराज हे 'असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जन्स ऑफ इंडिया'चे माजी अध्यक्ष आणि 'द स्पाइन फाउंडेशन' चे संस्थापक डॉ. शेखर भोजराज हे मणक्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, मणक्यातील विकृती आणि मणक्याचा क्षयरोग (स्पायनल ट्युबरक्युलॉसिस) यांवरील उपचारांमध्ये तज्ज्ञ आहेत.  ते मुंबईतील लीलावती हॉस्पिटल आणि ब्रीच कँडी हॉस्पिटल अशा अनेक अग्रगण्य रुग्णालयांमध्ये रुग्णांना वैद्यकीय सल्ला देतात. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळात 10,000 हून अधिक मणक्याच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. दिनांक 11 जुलै 2026 रोजी ओरोस येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये डॉ. शेखर भोजराज हे मणक्यावरील आजाराची तपासणी करणार आहेत. 

त्यासाठी रुग्णांची पूर्व तपासणी व  नोंदणी पिंगुळी  येथील आरोग्यम या फिजिओथेरपी क्लिनिक मध्ये करण्यात येणार आहे. उपचाराची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 11 जुलै रोजी होणाऱ्या मणक्यांच्या आजाराच्या मोफत तपासणी व उपचारासाठी  शिबिरात पाठवले जाणार आहे. तरी ज्या रुग्णांना मणक्यासंबंधीचे आजार (सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस लंबर स्पॉन्डिलोसिस, स्लिप डिस्क / इंटरव्हर्टेब्रल डिस्क प्रोलॅप्स, सायटिका, स्पायनल कॉर्ड इन्ज्युरी इत्यादी) आहेत. अशा रुग्णांनी पूर्व तपासणी साठी व वरील शिबिराचा लाभ घेण्यासाठी दिनांक 09 जुलै 2026 रोजी सकाळी 09.00 ते दुपारी 2.00 या वेळेत पूर्व मोफत तपासणीसाठी आरोग्यम क्लिनिक, रवळनाथ प्लाझा,तळ मजला, पिंगुळी येथे उपस्थितीत राहाण्याचे आवाहन बॅ.नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा श्रीम. आदिती पै आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले आहे. 

पूर्व नोंदणीसाठी रुग्णांनी डॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल  (मोबाईल नं - 8270970066) आणि सौ.वैशाली ओटवणेकर (मोबाईल नं - 9881886606) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.