LIVE UPDATES

आंबोलीत कोसळले दगड

पालकमंत्र्यांकडून तात्काळ दखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 07, 2026 20:26 PM
views 178  views

सावंतवाडी : आंबोली घाटातील दरडी कोसळलेल्या जागेपासून काही अंतरावर असलेल्या चार नंबर धबधब्यालगत आंबोली घाटमार्गातील मुख्य रस्त्यावर भले मोठे दोन ते तीन दगड थेट रस्त्यावर कोसळले. या मार्गावर नेहमीप्रमाणे मोठी वर्दळ सुरु होती. मात्र ज्यावेळी हे दगड कोसळले त्यावेळी सुदैवाने त्या भागात कोणतंही वाहन नसल्याने मोठी हानी टळली. सद्यस्थितीत हे दगड त्याच ठिकाणी असून दुचाकी व छोट्या चारचाकी गाड्यांची एक मार्गी वाहतूक सुरू आहे.

दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना हे दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  याबाबत महामार्ग प्राधिकरणच्या अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्या ठिकाणी जेसीबी पाठविण्यात आला आहे. लवकरच हे दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.