LIVE UPDATES

रोह्यावर महापुराची काळरात्र

भिरा धरणातून पाण्याचा विसर्ग | रोहा - अष्टमीत मध्यरात्री पुराचा कहर
Edited by: कोकणसाद LIVE वृतसेवा
Published on: July 06, 2026 21:18 PM
views 45  views

रोहा : रुपेश रटाटे | भिरा जलप्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर रोहा-अष्टमी शहरासह कुंडलिका नदीकाठच्या गावांवर मध्यरात्री महापुराचे संकट कोसळले. मुसळधार पाऊस, अंधार, खंडित वीजपुरवठा आणि वेगाने वाढणारी पूरस्थिती यामुळे हजारो नागरिकांनी भयभीत वातावरणात संपूर्ण रात्र जागून काढली. मात्र प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवकांनी वेळेवर केलेल्या बचाव व मदतकार्यामुळे मोठी जीवितहानी टळली. भिरा परिसरात २४ तासांत २५०.२० मिमी पावसाची नोंद झाल्यानंतर भिरा पिकअप वेअरचे तीनही दरवाजे उघडण्यात आले. २०८.०७ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होताच कुंडलिका नदीने रौद्ररूप धारण केले. मध्यरात्रीनंतर रोहा, अष्टमी, वरसे, रोठखुर्दसह नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी वेगाने शिरले.

पहाटे तीन वाजताच्या भरतीचा धोका लक्षात घेऊन नगराध्यक्षा वनश्री शेडगे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे आणि मुख्याधिकारी अजय एडके यांनी रात्रभर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले. नियंत्रण कक्षातून सातत्याने संपर्क ठेवून नागरिकांना धीर देत मदतकार्याचे प्रभावी नियोजन करण्यात आले. अष्टमीतील खालचा मोहल्ला, कोळीवाडा, धनगर आळी, मराठा आळी, त्रिमूर्ती नगर, शिवकृपा, धनलक्ष्मी परिसर, रोहा बाजारपेठ, रायकर पार्क, दमखाडी आणि कासार आळीसह अनेक भागांत पुराचे पाणी घरांमध्ये शिरले. काही ठिकाणी तीन फूटांपर्यंत पाणी साचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

वीज यंत्रणा पाण्याखाली गेल्याने सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शहराचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. सायरन यंत्रणा बंद पडल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेचे संदेश देण्यात आले. दरम्यान, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, डॉ. अवनी शेडगे, सचिन शेडगे, मुख्याधिकारी अजय एडके, नगरपालिका अधिकारी-कर्मचारी, नगरसेवक, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन, एनव्हीएसएसआर, RESQ पुणे, स्वयंसेवक आणि स्थानिक तरुणांनी रात्रभर बचाव मोहिमेत सहभाग घेतला. राफ्टिंग बोटींच्या साहाय्याने अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका करून त्यांना स्थलांतरित करण्यात आले.