
आपत्कालीन यंत्रणेला तातडीने मदतीचे आदेश
कुडाळ : तालुक्यातील चेंदवण गावातील येथे रविवारी झालेल्या वादळी पावसाने मेस्त्री आणि चेंदवणकर कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक यांनी याची पाहणी करून संबंधित यंत्रणेला तातडीने मदत करण्याच्या सूचना केल्या.
चेंदवण परिसरात रविवारी झालेल्या वादळी पावसाने टेंबवाडी येथील विजय मेस्त्री, श्रीमती गिरीजा मेस्त्री, गणपत मेस्त्री यांच्या घरावर झाड पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये विजय मेस्त्री यांचे देवघर पूर्णपणे जामीनदोस्त झाले तर गिरीजा मेस्त्री व गणपत मेस्त्री यांचे राहत्या घराचे छप्पर पूर्णपणे तुटून भिंतीना तडे गेले आहेत. तसेच आंबेडकर नगर रहिवासी सत्यवती विष्णू चेंदवणकर यांच्या घराला देखील संपूर्ण तडे जाऊन भिंती दुभंगल्या आहेत.
दरम्यान याची माहिती मिळताच कुडाळ सभापती मिलिंद नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते. उप जिल्हा प्रमुख अरविंद करालकर, उपतालुका प्रमुख/माजी सरपंच देवेंद्र नाईक, सुशील कदम घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्षपणे पाहणी करून संबंधित तहसीलदार व आपत्कालीन अधिकारी यांना तातडीने मदत करण्याची सूचना केली. तसेच जिल्हाधिकारी यांना सुद्धा नुकसानीची माहिती देणार असल्याचे मिलिंद नाईक यांनी सांगितले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी घरांचे मोठे नुकसान झाले असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. शिवसेने कडून दोन्ही कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली.यावेळी चेंदवण शाखाप्रमुख तुषार नाईक गटप्रमुख दादा ठोंबरे, नाईकनगर गट प्रमुख स्वप्निल चेंदवणकर तंटामुक्ती अध्यक्ष भूपेश चेंदवणकर , उपसरपंच रश्मी नाईक उपस्थित होते












