LIVE UPDATES

महावितरण, वनविभाग अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधी तुटून पडले

विद्युत पुरवठा खंडित झाल्याने आक्रमक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 07, 2026 20:45 PM
views 41  views

माजी मंत्री दीपक केसरकरांंनी घेतला आढावा ; उर्जा राज्यमंत्र्यांसह बैठक 

सावंतवाडी : सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यात विजेचा खेळखंडोबा असताना आपत्ती व्यवस्थापन बैठकीच आयोजन माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी केले होते. या बैठकीस महावितरणचे अधिक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे अनुपस्थित राहिल्याने आम. केसरकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. हक्कभंगाचा इशारा अधिकाऱ्यांना देताच ते उपस्थित राहिले. यावेळी या परिस्थितीचा आढावा घेत आम. केसरकर यांनी तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठीचे आदेश दिले. यासाठी लागेल ती मदत पुरवण्याची माहिती दिली.  

आम. केसरकर म्हणाले, १४ दिवस दोडामार्गसह इतर तालुक्यातील भाग अंधारात आहेत. उद्या उर्जा राज्यमंत्र्यांसह याबाबत बैठक आहे. मात्र, तुम्ही बैठकीला‌ का उपस्थित नव्हता ? असा सवाल त्यांनी केला. यावेळी भेटीस आलेल्या शिष्टमंडळासह उपस्थित असल्याने बैठकीस यायला विलंब झाल्याचे सांगत अधिक्षक अभियंता यांनी दिलगीरी व्यक्त केली. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. श्री. केसरकर यांनी तुमच्याकडे सुविधांचा अभाव आहे का ? मनुष्यबळ नाही का ? असा सवाल केला. यावेळी अधिकाऱ्यांनी काम सुरू असून आज रात्री व उद्या सकाळपर्यंत आंबोलीसह इतर सह्याद्री पट्टयातील भागातील पुरवठा सुरू होईल असं आश्वासन दिले. तसेच मळगाव, तळवडे, निरवडेसह इतर भागात उद्यापर्यंत पुरवठा सुरू होईल, मळेवाड मधील भागातही काम सुरू आहे अशी माहिती दिली. 

तर आठ-आठ दिवस लाईट का नाही ? याचे कारण द्या असा प्रश्न श्री. केसरकर यांनी उपस्थित केला. तसेच राज्याच्या उर्जा विभागाला ही माहिती का देत नाही ? असाही सवाल केला.

दरम्यान, दोडामार्ग ३३ केव्ही लाईन चालू झाली असून २ दिवसांत इतर भागातील पुरवठा पुर्ववत होईल. टीम घटनास्थळी कार्यरत असून आज आणि उद्यापर्यंत ही समस्या मिटेल अशी माहिती महावितरण अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी लोकप्रतिनिधींनी उप कार्यकारी अभियंतांना चारचाकी वाहन द्या, त्यांच्याकडे वाहन नसल्याने ते रात्री फिरत नाही, आढावा घेत नाहीत अशी तक्रार केली. यावेळी कार्यकारी अभियंतांनी वाहन उपलब्ध असल्याचे सांगितले. तर वेंगुर्ला रेडी भागातील लाईट उद्यापर्यंत पूर्ववत होईल असंही स्पष्ट केले. यावेळी उद्या उर्जा राज्यमंत्री यांच्यासह होणाऱ्या बैठकीत या समस्यांबाबतची माहिती द्यावी असे आदेश श्री.‌ केसरकर यांनी दिले. 

यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, सभापती सुस्मिता जाधव, मुख्याधिकारी विनायक औंधकर, प्रांताधिकारी विरसिंग वसावे, तहसिलदार श्रीधर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष नगरसेवक संजू परब, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर, शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे, शिवसेना युवासेना तालुका प्रमुख क्लेटस फर्नांडीस, चंद्रकांत जाधव, संजय गावडे, नंदन वेंगुर्लेकर, मळगांव प्रशासक हनुमंत पेडणेकर, महेश खानोलकर, बाळा जाधव, बाळ बोर्डेकर, निवृत्त कामगार अधिकारी शेखर पाडगांवकर, शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ, वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड, नगरसेवक अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, उभादांडा जि.प. सदस्य संजय गावडे, माजी जि.प. सदस्य मंगेश तळवणेकर, राजू पनवेलकर, महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद अधिकारी, महावितरण, वन विभाग, महसूल, पोलिस अधिकारी, कृषी विभागासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरलं. रस्ते खराब असल्याने ते आक्रमक झाले. तर सुधा कवठणकर यांनी स्थानिक युवक महावितरणमध्ये रक्त आटेपर्यत काम करतात. मात्र, त्यांना तुटपुंज्या पगारावर नोकरी आहे. काम चुकार अधिकारी लाखोनी पगार घेत आहे. तसेच गणेशप्रसाद गवस, नारायण राणे, दिनेश गावडे, मंगेश तळवणेकर, नंदन वेंगुर्लेकर, सचिन देसाईंसह उपस्थितांनी विविध विषयांवर अधिकारी वर्गाला धारेवर धरले.

दरम्यान, वनविभागाकडून झाडाच्या फांद्या तोडल्या की केसीस दाखल केल्या जातात. आज झाडांच्या फांद्या वेळीच न तोडल्याने ही परिस्थिती दोडामार्ग तालुक्यासह इतर भागात आहे. इतर ठिकाणी होणारी जंगलतोड वन विभागाला दिसत नाही असा सवाल लोकप्रतिनिधींनी करत दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले.