LIVE UPDATES

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा

हिंदू जनजागृती समितीचे तहसीलदारांना निवेदन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 11, 2026 17:57 PM
views 27  views
#kokansadlive#news update#konkan update#

मालवण : १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशी देशभरात मोठ्या उत्साहात तिरंगा फडकवला जातो. मात्र, या राष्ट्रीय सणांनंतर अनेक ठिकाणी राष्ट्रध्वज रस्त्यावर, कचऱ्यात किंवा अन्य ठिकाणी अनादराच्या अवस्थेत आढळून येतात. विशेषतः प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची मोठ्या प्रमाणात विक्री व वापर होत असल्याने त्यांची विटंबना होण्याची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली.


यासंदर्भात तहसीलदार तसेच संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांमुळे होणारा अवमान रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश यापूर्वी न्यायालयानेही शासनाला दिले आहेत.

‘सिंगल यूज प्लास्टिक’च्या वापरावर असलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचे उत्पादन व विक्री रोखण्यासाठी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. ‘भारतीय ध्वजसंहिता, २००२’नुसार राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

जिल्हास्तरावर ‘ध्वज संरक्षण पथक’ स्थापन करून त्यामध्ये स्वयंसेवी संस्थांचाही समावेश करावा. प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करून प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचे उत्पादन, विक्री आणि वापर यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

राज्य शासन, शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा  ही जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनानंतर सार्वजनिक ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज तातडीने संकलित करून ‘भारतीय ध्वजसंहिता’नुसार त्यांची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून हिंदू जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा  या उपक्रमांतर्गत व्याख्याने, प्रश्नमंजुषा, फलक प्रदर्शन आणि विविध जनजागृती मोहिमा राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाला प्रशासनाने तसेच नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.यावेळी अॅड. हेमेंद्र गोवेकर, दशरथ कवटकर, राजन सकपाळ, दीनानाथ गावडे, श्रीराम परब, अनिकेत फाटक, प्रीत मांजरेकर, गणेश आदी उपस्थित होते.