LIVE UPDATES

सिंधुरत्न समृद्ध योजना २.० तून नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या

नागरिकांच्या गरजांवर आधारित प्रस्ताव सादर करा ; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 11, 2026 18:42 PM
views 19  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’च्या माध्यमातून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख उपक्रम हाती घ्यावेत. जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देता येत नसलेल्या, मात्र नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या योजनांचे ठोस व व्यवहार्य प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या सन 2022-23 ते 2024-25 या कालावधीतील मंजूर कामे तसेच ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’च्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या विकासकामांची सद्यस्थिती, मंजूर व पूर्ण झालेली कामे, प्रलंबित कामे तसेच अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सन 2022-23 ते 2024-25 या कालावधीतील मंजूर कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी. कामांच्या अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही, याची सर्वोतोपरी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’च्या माध्यमातून पर्यटन, रोजगार, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य देतानाच जिल्ह्याच्या दीर्घकालीन विकासासोबत व्यापक जनहित साधणाऱ्या प्रकल्पांची निवड करावी, असेही त्यांनी सांगितले.

योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. रोजगारनिर्मिती वाढविणे, नागरिकांचे दरडोई उत्पन्न उंचावणे आणि जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणे या उद्दिष्टांच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित करून त्यांचे प्रस्ताव सादर करावेत. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची गावनिहाय माहिती संकलित करून पर्यटकांसाठी आवश्यक नवीन सुविधा, सुशोभीकरण व मूलभूत पायाभूत सुविधांबाबत ठोस प्रस्ताव तयार करावेत. स्थानिक वैशिष्ट्ये, नैसर्गिक सौंदर्य तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचा प्रभावी वापर करून पर्यटनवाढीस चालना देणाऱ्या संकल्पना राबवाव्यात, असे जिल्हाधिकारी यांनी निर्देशित केले.

सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असलेल्या पर्यटनस्थळांना प्राधान्य देऊन तेथे आवश्यक पर्यटकाभिमुख सुविधा निर्माण करण्याचे नियोजन करावे. तसेच जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांची सर्वंकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन वेब पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. नवीन पर्यटनस्थळांचा विकास, पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सुविधा आणि स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना देणाऱ्या उपक्रमांवर विशेष भर देऊन संबंधित विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पर्यटनस्थळांचा आढावा घेऊन प्राधान्यक्रमानुसार ठोस व व्यवहार्य प्रस्ताव सादर करावेत, असेही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.