LIVE UPDATES

नुकसानभरपाईसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

उर्जा राज्यमंत्र्यांसह उद्या बैठक : आम‌. दीपक केसरकर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 07, 2026 20:47 PM
views 53  views

सावंतवाडी : गेल्या दोन दिवसांत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तिन्ही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून महावितरणचे विद्युत खांब जमीनदोस्त झाल्याने वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज तातडीने आढावा बैठक घेण्यात आली असून वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. तर उद्या उर्जा राज्यमंत्र्यांसह बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या गंभीर परिस्थितीमुळे चालू अधिवेशन सोडून यावे लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, महामार्गावर साचणारे पाण्याचा तत्काळ योग्य बंदोबस्त करण्यासाठी आणि वीजवाहिन्यांवर येणारी झाडी कापण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत दिली आहे. गेल्या आठ दिवसांपासून लाईट नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. आज रात्रीपर्यंत बहुतांश भागातील वीजप्रवाह सुरू होईल, तर उर्वरित भागातील प्रवाह पुढील दोन दिवसांत सुरळीत केला जाईल. यासाठी वाहन कटिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आली असून, आठवडाभरात यावर ठोस कार्यवाही होईल. तसेच वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी महावितरणला जादाची कुमक म्हणजेच मनुष्यबळ उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. कामाचा वेग वाढवण्यासाठी लागणाऱ्या गाड्या भाड्याने घेतल्यास त्याचे भाडे आणि वाहिनीवरील झाडे कापण्यासाठी लागणारे कटर खरेदीचे पैसे आपण स्वतः देणार असल्याचे आश्वासन केसरकर यांनी दिले. तसेच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुढील दोन दिवसांत ऊर्जा राज्यमंत्र्यांसोबत विशेष बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

भविष्यात अशा आपत्तींचा फटका बसू नये म्हणून किनारपट्टीसह इतरही भागात 'अंडरग्राउंड' वीज वाहिन्या टाकण्यासाठी आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. वादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारल्यानंतर मतदारसंघातील इतरही प्रश्न मार्गी लावले जातील, असे सांगत केसरकर यांनी, "झालेल्या गैरसोयीबद्दल मला अत्यंत दुःख आहे, मात्र लोकांनी कठीण काळात जो संयम पाळला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अशा भावना व्यक्त केल्या. येत्या दोन दिवसांत सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.