
कणकवली : कणकवली शहरालगतच्या हळवल फाटा येथील महामार्ग परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अंधाराचे साम्राज्य असायचे. विशेषतः येथील तीव्र वळणामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अंधारामुळे अपघाताचा धोका वाढला होता. त्यामुळे कै. अजित पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी हायमास्ट लावण्याची मागणी पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे केली होती.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित महामार्ग प्राधिकरणाला हळवल फाटा येथे हायमास्ट बसविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हायमास्ट बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हळवल फाटा येथे विद्युत हायमास्ट सुरू करण्यात आल्याने रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला आहे. त्यामुळे तीव्र वळणावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार असून, अंधारामुळे होणारे संभाव्य अपघात रोखण्यास मदत होणार आहे.
हायमास्ट बसविण्यात आल्याने वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे हळवल फाटा परिसरातील महत्त्वाची समस्या मार्गी लागल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.










