LIVE UPDATES

कणकवलीत प्रवाशांकडून कारचालकावर चाकूने जीवघेणा हल्ला

हल्लेखोर पसार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 15, 2026 11:52 AM
views 160  views
#kokansadlive#news update#konkan update#

कणकवली :  राजापूर येथून स्विफ्ट कारने तीन प्रवाशांना घेऊन गोवा येथे निघाले असता त्या प्रवाशांनी चाकूने कार चालकावर जीवघेणा हल्ला केला. महामार्गावर हुंबरट येथे रविवारी रात्री १० वाजण्याच्या  सुमारास ही घटना घडली. कारचालकाने आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर प्रवासी पसार झाले.

 जखमी कारचालक रेहान इकबाल सय्यद (३२, रा. वाघुवाड़ा-राजापूर) यांच्यावर सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.राजापूर बसस्टॅण्डवर गोवा येथे जाण्यासाठी तीन प्रवासी थांबले असल्याची माहिती रविवारी रात्री ८ वा. च्या सुमारास रेहान सय्यद यांना त्यांचा चुलत भाऊ वसीम मालिन याने दिली. त्यानंतर रेहान याने त्या प्रवाशांची भेट घेत राजापूर ते गोवा असे ४००० रु. भाडे ठरविले व त्या तीन प्रवाशांना घेऊन रेहान हे स्वीप्ट कारने गोवा येथे जाण्यासाठी निघाले.

रविवारी रात्री १० वा. च्या सुमारास कार हुंबरट येथे आली असता त्या प्रवाशांनी लघुशंकेसाठी कार थांबविण्यास सांगितली. कार थांबविल्या नंतर काही वेळात त्यातील एकाने गाडीच्या चावीची मागणी केली. त्याला रेहान याने नकार देताच गाडीत मागच्या सीटवर बसलेल्या दुसऱ्याने रेहान याचा गळा दाबून धरला तर तिसऱ्याने चाकू रेहान यांच्या छातीवर मारण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, आपण बाजूला सरकल्याने वार चुकला. त्यानंतर आपण कार मधून बाहेर पडलो. त्या प्रवाशांनी आपल्या दोन्ही पायांवर चाकूने वार करत जखमी केले. या हल्ल्यानंतर आपण आरडाओरडा केला असता हल्लेखोर पळून गेले.