
सावंतवाडी : शहरातील प्रसिद्ध 'चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ' गेल्या ३५ वर्षांपासून अविरतपणे गणपती बाप्पांची सेवा करत आहे. सावंतवाडी आणि परिसरात आकर्षक हलते देखावे सादर करण्याची एक विशेष परंपरा या मंडळाने जतन करून ठेवली आहे. याच परंपरेचे सातत्य राखत यंदा मंडळाच्या वतीने "समुद्र मंथन" हा भव्य आणि आकर्षक हलता देखावा सादर करण्यात आला आहे.
पौराणिक कथेवर आधारित असलेला 'समुद्र मंथन' हा देखावा अतिशय तंत्रशुद्ध आणि रेखीवपणे तयार करण्यात आला आहे. देखाव्यातील जिवंतपणा आणि हलत्या हालचालींमुळे हा देखावा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे.
हा उत्कृष्ट आणि कलात्मक देखावा पाहण्यासाठी आज सकाळपासूनच भाविकांनी मंडपात मोठी गर्दी केली आहे. बाप्पांचे दर्शन घेण्यासोबतच हा अनोखा हलता देखावा अनुभवण्यासाठी आबालवृद्धांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.










