
सिंधुदुर्गनगरी : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (NP-NCD) अंतर्गत मार्गदर्शक सूचनांनुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत राज्यात ३० वर्षे व त्यावरील महिला व पुरुषांची असंसर्गजन्य आजारांसाठी तपासणी करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हे अभियान १ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत विविध टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
या अभियानात मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग यांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीमध्ये संशयित आढळणाऱ्या नागरिकांना पुढील तपासणी, निदान व उपचारासाठी संदर्भित करण्यात येणार आहे.
अभियानाचे सात टप्पे
अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे सात टप्पे निश्चित करण्यात आले आहेत.
टप्पा १ – प्रशिक्षण
आरोग्य कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षण.
टप्पा २ – ३० वर्षांवरील नागरिकांची Line Listing व NP-NCD नोंदणी
३० वर्षे व त्यावरील नागरिकांची यादी तयार करून NP-NCD पोर्टलवर नोंदणी.
टप्पा ३ – गावपातळीवरील Screening
गावपातळीवर नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी.
टप्पा ४ – उर्वरित गावांमधील Screening
उर्वरित गावांमध्ये ३० वर्षांवरील नागरिकांची तपासणी पूर्ण करणे
टप्पा ५ – HWC स्तरावरील Screening
आरोग्य वर्धिनी केंद्र स्तरावर आवश्यक तपासणी.
टप्पा ६ – तालुका/जिल्हास्तरीय तपासणी
गरजेनुसार पुढील तपासणी व उपचारासाठी तालुका व जिल्हास्तरावर सेवा उपलब्ध करून देणे.
टप्पा ७ – तृतीयस्तरीय आरोग्य सेवा
आवश्यकतेनुसार नागरिकांना पुढील/तृतीयस्तरीय आरोग्य सेवेसाठी संदर्भित करणे.
नागरिकांना आवाहन
३० वर्षे व त्यावरील प्रत्येक महिला व पुरुषाने या अभियानात सहभागी होऊन मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोगाची प्राथमिक तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.











