
वैभववाडी : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार आयोजित या कार्यक्रमाला शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नगरपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे पुष्प देऊन स्वागत केले. तसेच त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन व सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याबाबत यावेळी विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी उमेश स्वामी यांनी ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार, बँक खात्याची सुरक्षितता, ओटीपी व वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर न करणे तसेच संशयास्पद संदेश व लिंकपासून सावध राहण्याबाबत माहिती दिली.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना आवश्यक असणारे दाखले मिळविण्यासाठी कार्यालयीन धावपळ होऊ नये, यासाठी नगरपंचायतीच्या वतीने आवश्यक दाखल्यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या उपक्रमाचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाचे आभार मानले.













