LIVE UPDATES

कुडाळ येथे 'प्रोजेक्ट संजीवनी'चा भव्य शुभारंभ

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला मिळणार नवे बळ
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 17, 2026 13:41 PM
views 46  views

कुडाळ : ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या गावातच आरोग्य व रक्त तपासणीची आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या 'प्रोजेक्ट संजीवनी' या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच अणाव येथे उत्साहात पार पडला. 'एक थेंब... एक आशा' या प्रेरक संकल्पनेवर आधारित या प्रकल्पाचा प्रारंभ कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

या कार्यक्रमास देशाचे माजी केंद्रीय मंत्री व कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू, मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. सुरेश प्रभू यांनी देशाच्या विकासात दिलेले योगदान प्रेरणादायी असून अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू होणे हे सिंधुदुर्गाचे भाग्य असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी करण्यात आले.

रक्त तपासणी व प्राथमिक तपासण्यांसाठी आता ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात धाव घ्यावी लागणार नाही. गावातच सुविधा उपलब्ध झाल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांची मोठी सोय होणार आहे. 'एक थेंब... एक आशा' या मोहिमेद्वारे रक्ताच्या चाचण्यांतून गंभीर आजारांचे प्राथमिक टप्प्यातच निदान शक्य होईल, ज्यामुळे पुढील उपचारांचा मार्ग सुकर होईल. प्रवासाचा खर्च आणि लागणारा वेळ वाचणार असल्याने गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. नियमित मोफत चाचण्यांमुळे ग्रामीण जनतेमध्ये आरोग्याबद्दल जनजागृती आणि सतर्कता निर्माण होण्यास मदत होईल.

मानव साधन विकास संस्थेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सिंधुदुर्गातील ग्रामीण आरोग्याचा दर्जा उंचावण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.