
वेंगुर्ले : आजच्या काळात हिंदू समाजाने संघटित होणे ही काळाची गरज आहे. आपली संस्कृती, परंपरा, भाषा, सण-उत्सव आणि धार्मिक मूल्ये जपण्याची जबाबदारी प्रत्येक हिंदूची आहे. हिंदू समाज संघटित असेल तर राष्ट्र अधिक सक्षम आणि सुरक्षित राहील. आपल्या संतांनी नेहमीच समाजाला एकतेचा संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून धर्म, संस्कृती आणि स्वाभिमानाचे रक्षण केले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणही समाजहितासाठी कार्यरत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक सत्यविजय नाईक यांनी तुळस येथे बोलताना केले.
हिंदू समाजामध्ये एकात्मता, संघटन आणि धर्मजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाजाच्यावतीने रविवारी (२१ जून) सायंकाळी तुळस येथील उत्सव मंगल कार्यालयात "भव्य सकल हिंदू संमेलना"चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मार्गदर्शन करताना सत्यविजय नाईक बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कीर्तनकार सुबोध मराठे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सत्यविजय नाईक, गणेश गोविंद उर्फ राजू जोशी गुरूजी, अमित गोपाळ नाईक, नितीन लिंगोजी आदी उपस्थित होते.
संमेलनाच्या प्रारंभी सभागृहाबाहेर तुळस येथील उद्योजक आनंद तांडेल यांनी सपत्नीक गो मातेचे पूजन केले. तुळस, पाल, अणसूर, पेंडूर, मातोंड, होडावडे व वजराट या गावांतील हिंदू बांधवांच्या संयुक्त पुढाकाराने हे संमेलन पार आयोजित करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना गणेश गोविंद उर्फ राजू जोशी गुरूजी यांनी हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान, संस्कृतीचे महत्त्व आणि संघटित समाजाची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, हिंदू धर्माचे पालन आपल्या घरापासून केले पाहिजे. संतानी आपल्याला जी शिकवण दिली आहे, त्या नुसार आचरण करावे असे सांगितले.
ज्येष्ठ कीर्तनकार सुबोध मराठे यांनी संस्कार विषयी मार्गदर्शन केले. तर अमित नाईक यांनी पंचपरिवर्तन याविषयी मार्गदर्शन करताना हिंदू धर्माने भारतालाच नाही तर जगाला ज्ञान दिले आहे. फक्त त्याचा विसर आता हिंदू समाजाला पडला आहे. त्याची जागृती करण्यासाठी अशी संमेलने आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर यांनी तर प्रास्ताविक नितीन लिंगोजी यांनी केले. या हिंदू संमेलनाच्या माध्यमातून आपण सर्वांनी हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संकल्प करूया असे आवाहन यावेळी आयोजकांनी केले. या संमेलनाला वेंगुर्ले तालुका संघ चालक बाबुराव खवणेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, पंचायत समिती सभापती शंकर घारे, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, मच्छीमार नेते वसंत तांडेल, तुळस उपसरपंच सचिन नाईक, मातोंड सरपंच मयुरी वाडाचेपाटकर, पाल सरपंच कावेरी गावडे,अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, वजराट सरपंच अनन्या पुराणिक,
होडावडा उपसरपंच राजबा सावंत यांच्या सह या सर्व गावातील हिंदू बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवकालीन शस्त्रांची प्रात्यक्षिके बिलवाडी येथील युवक युवतींनी दाखवून संमेलनात उत्साह निर्माण केला.












