
देवगड : सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत, दऱ्या-खोऱ्यांत आणि गड-किल्ल्यांच्या साक्षीने जपलेली मैत्री ही केवळ ट्रेकिंगपुरती मर्यादित नसते, तर आयुष्यभर टिकणारे एक अनमोल नाते जुळते. अशाच सह्याद्रीप्रेमी आणि मुंबई पोर्ट अथॉरिटीमधून सेवानिवृत्त झालेल्या साहसी गिर्यारोहकांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेला सत्कार सोहळा नुकताच नेरळ येथील रॉयल फार्म हाऊस येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
मुंबई पोर्ट अथॉरिटीमध्ये अनेक वर्षे सेवा बजावणारे आणि त्याचबरोबर सह्याद्रीच्या गड-दुर्गांची, डोंगरवाटा आणि निसर्गाची मनमुराद भटकंती करणारे अनेक गिर्यारोहक गेल्या काही वर्षांत सेवानिवृत्त झाले. कोरोनाच्या महामारीमुळे काही काळ थांबलेल्या या स्नेहमेळाव्यांना पुन्हा नवसंजीवनी देण्याचे कार्य ज्येष्ठ गिर्यारोहक श्री. सुधीर नारायण कोमूर्लेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतले.
या प्रसंगी सह्याद्री परिवारातील अनेक गिर्यारोहकांच्या उपस्थितीत एकनाथ मराठे, सुरेश शिर्शीकर, राजेंद्र गायकवाड, सुहास सावंत, संजय नलावडे, सतीश चव्हाण, दशरथ घाडी, प्रमोद कारेकर आणि तुळशीदास सूर्यवंशी या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
सह्याद्रीतील ज्येष्ठ आणि अनुभवी गिर्यारोहक उल्हास विरकुड तथा विवेक तवटे यांच्या हस्ते सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. आयुष्यभराची सेवा, सह्याद्रीप्रती असलेली निष्ठा आणि सहकाऱ्यांशी जपलेले ऋणानुबंध यांचा या सोहळ्यात यथोचित गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा “विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार” जाहीर झालेले सह्याद्रीप्रेमी गिर्यारोहक मंगेश जनार्दन-जयश्री सावंत यांनी केले. त्यांच्या ओघवत्या आणि दिलखुलास निवेदनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
हा सत्कार सोहळा केवळ सेवानिवृत्त सहकाऱ्यांचा सन्मान नव्हता, तर सह्याद्रीच्या कुशीत घडलेल्या मैत्रीचा, जपलेल्या आठवणींचा आणि पुढील पिढीला प्रेरणा देणाऱ्या साहसी परंपरेचा एक उत्सव होता. गड-किल्ल्यांच्या वाटांवर घडलेले हे स्नेहबंध भविष्यातही असेच दृढ राहोत, हीच सर्व उपस्थितांची भावना होती.












