LIVE UPDATES

नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर

संजय तारकर - वैभव करंगुटकर यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 22, 2026 17:16 PM
views 22  views

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड-जामसंडे नगरपंचायत प्रभाग क्रमांक १ मधील तरवडी, पिरवाडी व कावळेवाडी परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ८५ नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.

हे आरोग्य शिबिर माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर व भाजप शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजित करण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र इळये व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना विविध आरोग्य तपासण्या एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या.

शिबिरामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी, रक्तदाब (बी.पी.) तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, मधुमेह तपासणी, हृदयविकार रुग्णांसाठी ईसीजी, कॅल्शियम तपासणी, कम्प्लिट ब्लड काउंट (सीबीसी), महिलांसाठी हिमोग्लोबिन (एच.बी.) तपासणी, किडनी फंक्शन टेस्ट (केएफटी) तसेच लिव्हर फंक्शन टेस्ट (एलएफटी) अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. अनेक नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे प्राथमिक निदान करून त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्लाही देण्यात आला.

या शिबिरामुळे परिसरातील नागरिकांना आपल्या आरोग्याची वेळेवर तपासणी करून घेण्याची संधी मिळाली. तसेच विविध आजारांचे निदान प्रारंभीच्या टप्प्यात होण्यास मदत झाल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अजित गोगटे, बाळ खडपे, राजा भूजबळ, योगेश चांदोस्कर, दया पाटील, ज्ञानेश्वर खवळे, बापू जुवाटकर, सुभाष धुरी, हरिदास कांदळकर, मोहन शेटगे, संजय कावले यांच्यासह भाजप बूथ क्रमांक ६५ मधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम यशस्वी ठरला असून भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.