
कणकवली : मणक्याच्या विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी दि स्पाईन फाऊंडेशन, मुंबई आणि उपजिल्हा रुग्णालय, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल १५४ रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांवरही उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्पाईन फाऊंडेशनच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी सहा वेळा अशी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. शनिवारी पार पडलेले हे सातवे शिबिर होते.
या उपक्रमातून आतापर्यंत जिल्ह्यातील ६० रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मणक्याच्या एका शस्त्रक्रियेसाठी साधारणतः पाच ते सहा लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही गरजू रुग्णाला उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने स्पाईन फाऊंडेशनकडून या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जातात. डॉ. शेखर भोजराज यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ५० डॉक्टरांची टीम देशभरातील विविध ठिकाणी जाऊन गरजू रुग्णांची तपासणी व आवश्यक शस्त्रक्रिया विनामूल्य करते.
या शिबिरासाठी स्पाईन फाऊंडेशन, मुंबईचे अस्थिव्यंग विशेषज्ञ डॉ. निशांत सीतुत, डॉ. विस्मय हरकारे, डॉ. नील वोहरा, डॉ. प्रणित पावसकर तसेच सहाय्यक रोशन कुळे उपस्थित होते. त्यांनी रुग्णांची तपासणी करून आजाराचे स्वरूप जाणून घेतले आणि आवश्यक उपचारांबाबत मार्गदर्शन केले. शिबिराला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
तसेच डॉ. धनंजय रासम, डॉ. धनेश म्हसकर आणि डॉ. सर्वेश तायशेटे यांनीही शिबिराच्या यशस्वितेसाठी योगदान दिले. शिबिराच्या शुभारंभप्रसंगी डॉ. सुहास पावसकर, हरकुळ बुद्रुकचे सरपंच आनंद ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर, विजय गांवकर, सीताराम गावडे, हनुमंत घाडीगांवकर यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








