LIVE UPDATES

गणेशोत्सवात आरोग्यसेवेसाठी जिल्ह्यात २२ ठिकाणी आरोग्य पथके तैनात

पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार सभापती प्रितेश राऊळ यांच्याकडून बसस्थानके, रेल्वे स्थानके व चेकपोस्टची पाहणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 12, 2026 19:29 PM
views 17  views

वेंगुर्ला : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून सिंधुदुर्गात मोठ्या संख्येने दाखल होणारे गणेशभक्त आणि नागरिक यांना तातडीची व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील बसस्थानके, रेल्वे स्थानके तसेच महत्त्वाच्या चेकपोस्ट अशा एकूण २२ ठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांच्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी स्वतः विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली.

गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर तसेच राज्यातील अन्य भागांतून मोठ्या प्रमाणात नागरिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात. या पार्श्वभूमीवर प्रवासादरम्यान अथवा जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर नागरिकांना अचानक आरोग्यविषयक त्रास उद्भवल्यास तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख गर्दीच्या ठिकाणी आरोग्य पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ला यांसह जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या आरोग्य पथकांच्या कामकाजाचा प्रितेश राऊळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून उपलब्ध औषधसाठा, वैद्यकीय साहित्य, कर्मचारी व्यवस्था आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती त्यांनी घेतली.

प्रत्येक आरोग्य पथकामध्ये महिला व पुरुष आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, नागरिकांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी, प्राथमिक उपचार, आवश्यक औषधोपचार तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार पथकांकडे पॅरासिटामॉल, ORS पाकिटे तसेच रक्त नमुना घेण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ही आरोग्य पथके दोन सत्रांमध्ये कार्यरत राहणार असून सकाळी ८ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ८ या वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ताप, अंगदुखी, अतिसार, फ्लूसदृश लक्षणे आदी तक्रारी असलेल्या नागरिकांची तपासणी करून आवश्यक उपचार देण्यात येणार आहेत. गरज भासल्यास संबंधित रुग्णाला पुढील उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात संदर्भित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

गणेशोत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रत्येक गणेशभक्ताला आणि नागरिकाला तातडीची, प्रभावी व दर्जेदार आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, यासाठी आरोग्य पथकांनी सतर्क राहावे, अशा सूचना सभापती प्रितेश राऊळ यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. केवळ पथके नियुक्त करून न थांबता त्यांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या सुविधा आणि उपाययोजना वेळेत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.

पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा गणेशोत्सव काळात पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यात आली असून, बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि चेकपोस्ट अशा सर्व महत्त्वाच्या ठिकाणी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. गर्दीच्या काळात कोणत्याही नागरिकाला आरोग्यविषयक अडचण भासू नये आणि अडचण निर्माण झाल्यास त्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

गणेशोत्सव काळात नागरिकांनी कोणतीही आरोग्यविषयक अडचण भासल्यास जवळच्या आरोग्य पथकाची मदत घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.