LIVE UPDATES

कृषी विस्तार अधिकारी विलास कोलते यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा

३६ वर्षे ५ महिन्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी विशेष गौरव
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 03, 2026 19:31 PM
views 86  views

देवगड : पंचायत समिती देवगड अंतर्गत कृषी विभागात कार्यरत असलेले कृषी विस्तार अधिकारी विलास कोलते यांच्या ३६ वर्षे ५ महिन्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवापूर्तीनिमित्त पंचायत समिती देवगड येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. उपसभापती अमोल लोके व गटविकास अधिकारी निलेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

विलास कोलते यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात ग्रामसेवक ते कृषी विस्तार अधिकारी या पदांवर काम करताना प्रशासकीय कामकाजात प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि कार्यतत्परता जपत उल्लेखनीय योगदान दिले. ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजासह विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सहकार्यशील व मनमिळावू स्वभावामुळे अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये त्यांनी विश्वासाचे नाते निर्माण केले.

विलास कोलते यांनी १९९० मध्ये ग्रामपंचायत कुणकवण येथे ग्रामसेवक म्हणून शासकीय सेवेला सुरुवात केली. त्यानंतर २०११ मध्ये कसाल ग्रामपंचायतीत कार्यरत असताना ग्रामविकास अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. पुढे २०२४ मध्ये कृषी विस्तार अधिकारी म्हणून पंचायत समिती देवगड येथे पदोन्नती मिळाली. या संपूर्ण सेवाकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडल्या.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पंचायत समिती देवगड सदस्य विष्णू घाडी, वैभववाडी पंचायत समितीच्या उपसभापती साची कोलते, करुळ सरपंच नरेंद्र कोलते, ग्रामपंचायत सदस्य सचिन कोलते, सह्याद्री जीव संरक्षक संघटना करुळचे अध्यक्ष हेमंत पाटील, कृषी अधिकारी दिगंबर खराडे, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, गटशिक्षण अधिकारी मुकुंद शिनगारे, अधीक्षक कुणाल मांजरेकर, विस्तार अधिकारी (ग्रा.पं.) दिपक तेंडुलकर, विस्तार अधिकारी कृषी अभिजित मदने , विस्तार अधिकारी कृषी कृष्णकांत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी विभागातील सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपसभापती अमोल लोके यांच्या हस्ते विलास कोलते यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या मनोगतात कोलते यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील कार्याचा आढावा घेत त्यांच्या कार्यशैलीचे आणि योगदानाचे विशेष कौतुक केले. पंचायत समितीच्या कामकाजात त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगत त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

सत्काराला उत्तर देताना विलास जयराम कोलते यांनी सेवाकाळात सहकारी अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रदीर्घ सेवाकाळातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी आपल्या शासकीय सेवेचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांनी केले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी दिपक तेंडुलकर यांनी केले, तर आभार कृषी अधिकारी दिगंबर खराडे यांनी मानले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि सहकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.