
दोडामार्ग : पत्रकार परिषद घेऊन आम्हाला ‘डुप्लिकेट नगरसेवक’ म्हणणाऱ्या गटनेत्यानेच जिल्हाधिकाऱ्यांसमोर नगरसेवकांच्या पत्रावर आमच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली होती. त्यावेळी आम्ही त्यांना डुप्लिकेट दिसलो नाही का? असा सवाल करत भाजपचे नगरसेवक राजेश प्रसादी आणि संध्या प्रसादी यांनी गटनेते मणेरीकर यांच्यावर पलटवार केला. नगरसेवकांच्या साथीने गटनेता झाल्यानंतर त्याच नगरसेवकांना ‘डुप्लिकेट’ म्हणत असाल, तर डुप्लिकेट गटनेता कोण? असा थेट सवालही त्यांनी केला.
दोडामार्ग येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत संध्या प्रसादी आणि राजेश प्रसादी यांनी मणेरीकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील आरोपांना प्रत्युत्तर दिले. प्रसादी कुटुंबावर करण्यात आलेल्या आरोपांचाही त्यांनी यावेळी निषेध केला.
संध्या प्रसादी पुढे म्हणाल्या, मणेरीकर यांनी नगरपंचायतीच्या विविध कामांवर आपण ‘वॉच’ ठेवत असल्याचे सांगितले होते. त्यावर संध्या प्रसादी यांनी थेट सवाल केला. माझ्या प्रभागातील काम तुम्ही पाहा, असे मी कधी सांगितले नव्हते. मग माझ्या प्रभागातील काम पाहण्याची तुम्हाला गरज काय? कामांवर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित अधिकारी असतात. दुसऱ्यांच्या प्रभागात जाऊन काम पाहण्याची ही नवीन पद्धत गटनेत्याने कुठून आणली? असा सवाल त्यांनी केला. शहरातील रस्ते, गटारे आणि अन्य नागरी कामांकडे दुर्लक्ष; मात्र ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनची कामे सुरू आहेत, त्याच कामांवर विशेष लक्ष का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नगरसेवकांच्या साथीने गटनेता झाला, मग डुप्लिकेट गटनेता कोण?
मणेरीकर यांनी संतोष नानचे, रामचंद्र ठाकूर आणि राजेश प्रसादी यांना ‘डुप्लिकेट नगरसेवक’ संबोधल्यावर प्रसादी यांनी त्यांच्यावरच निशाणा साधला. गटनेत्याची निवड करताना जिल्हाधिकाऱ्यांकडे नगरसेवकांची आवश्यकता असते. ज्या नगरसेवकांच्या साथीने तुम्ही गटनेता झाला, त्यांनाच आज डुप्लिकेट म्हणत असाल, तर मग तुम्ही डुप्लिकेट गटनेता नाही का? अशी बोचरी टीका त्यांनी केली.
गटनेते म्हणून मणेरीकर यांनी आजपर्यंत एकही बैठक घेतलेली नाही. पक्षाने दिलेली आम्ही सर्व कामे योग्य पद्धतीने पार पाडली आहेत; मात्र या गटनेत्याने पक्षासाठी किंवा नगरसेवकांना एकत्र घेऊन काम करण्यासाठी काय केले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सही करून निघून जाणे कितपत योग्य?
नगरपंचायतीच्या मासिक सभेत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. नगराध्यक्ष अनुपस्थित असल्याने त्या प्रश्नांना सामोरे जाऊन त्यावर स्पष्टीकरण देणे आणि आरोप खोडून काढणे ही गटनेत्याची जबाबदारी होती. मात्र मणेरीकर यांनी केवळ सही करून सभेतून निघून जाणे कितपत योग्य आहे? असा सवाल संध्या प्रसादी यांनी केला. नगरपंचायतीच्या सभेत प्रश्न उपस्थित करणे हे नगरसेवकांचे काम आहे. मग गटनेत्याने ते स्वतःवर का ओढवून घेतले? प्रश्न उपस्थित केले म्हणूनच त्यांना लागले आहे, असा टोला त्यांनी लगावला.
मणेरीकर कामांवर वॉच ठेवतात मग नगरपंचायतचे इंजिनियर कशासाठी आहेत?
मणेरीकर यांनी नगरपंचायतीच्या विकासकामांच्या दर्जावर आपण लक्ष ठेवत असल्याचे सांगितले होते. त्यावर प्रसादी यांनी नुकतेच लोकार्पण झालेल्या तलावाचा मुद्दा उपस्थित केला. खरंच तुम्ही कामांवर वॉच ठेवत असाल, तर नुकतेच लोकार्पण झालेल्या तलावावर वाढलेली झाडी-झुडपे तुम्हाला दिसली नाहीत का? दुसरं म्हणजे नगरपंच्यायतचे इंजिनियर असताना मणेरीकर कशाला वॉच ठेवतात असा सवाल करत मणेरीकर यांच्या ‘वॉच’च्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
२.९२ कोटींची कामे याच डुप्लिकेट ठेकेदाराने केली?
नगरसेवक राजेश प्रसादी यांनीही मणेरीकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या कामाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. वॉर्ड क्रमांक ८ आणि ९ मध्ये तब्बल २ कोटी ९२ लाख रुपयांची कामे झाल्याचा दावा करत ही कामे याच ‘डुप्लिकेट ठेकेदाराने’ केल्याचा आरोप त्यांनी केला. सध्या नमो उद्यानाचे सुमारे एक कोटी रुपयांचे काम सुरू असून, ठेकेदाराने या गटनेत्याला तेथे पी.ए. म्हणून ठेवले आहे की कर्मचारी म्हणून? असा खोचक सवाल राजेश प्रसादी यांनी केला.
सही करून निघून जाणे म्हणजे चोराच्या मनात चांदणे
नगरपंचायतीच्या सभेत प्रश्न उपस्थित होतात, मात्र गटनेते केवळ सही करून निघून जातात, असा आरोप करत राजेश प्रसादी यांनी ‘चोराच्या मनात चांदणे’ अशी बोचरी उपमा दिली. २००२ पासून प्रसादी कुटुंब राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असल्याचे सांगितले. माझे पती कोणत्याही गरजूच्या एका हाकेला धावून जातात. अशा व्यक्तीच्या डोक्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांनी आधी स्वतःचा कारभार तपासावा, असे सांगत त्यांनी मणेरीकर यांचा खरपूस समाचार घेतला.











