LIVE UPDATES

तब्बल ११ वर्षानंतर दोडामार्ग पंचायत समितीची आमसभा

१३ ऑगस्ट रोजी आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 11, 2026 17:11 PM
views 29  views
#kokansadlive#news update#konkan update#

दोडामार्ग : तब्बल ११ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दोडामार्ग पंचायत समितीची आमसभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या सभेकडे तालुक्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी यांचे लक्ष लागून राहिले आहे. पूर्वनियोजित दि. ७ ऑगस्ट रोजी होणारी सभा अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून आता गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता महालक्ष्मी हॉल, दोडामार्ग येथे आमसभा होणार आहे. 

        आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न होणार आहे. पंचायत समितीच्या आमसभेला तालुक्यातील विकासकामांना दिशा देण्याच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे. तब्बल ११ वर्षांनंतर आमसभा होत असल्याने गेल्या काही वर्षांतील विविध विकासकामे, त्यांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रश्न तसेच आगामी काळातील विकासाचे नियोजन यावर सभेत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. सभेच्या विषयपत्रिकेत दि. ५ जून २०१५ रोजी झालेल्या सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांवरील कार्यवाहीस मान्यता देणे, तसेच त्याच सभेतील सूचनांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचे वाचन करणे या विषयांचा समावेश आहे.

      याशिवाय सन २०२५-२०२६ मध्ये दोडामार्ग तालुक्यात झालेल्या विविध कामांचा विभागवार आढावा घेण्यात येणार आहे. तसेच, सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षात करावयाच्या कामकाजाची रूपरेषा निश्चित करण्याबाबत सभेत चर्चा होणार आहे. दरम्यान, अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवरही चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या विविध समस्या सभेत मांडल्या जाण्याची शक्यता आहे.

तब्बल ११ वर्षांनंतर होत असलेल्या या आमसभेमुळे पंचायत समितीच्या कारभाराचा आढावा घेण्याबरोबरच आगामी विकासकामांच्या नियोजनाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. संबंधित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.