
वेंगुर्ला : कोकणातील गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि आपुलकीचा आनंदसोहळा. प्रत्येक कुटुंबाला हा सण आनंदाने व उत्साहाने साजरा करता यावा, या भावनेतून भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गणेशभक्तांना पूजा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत बुधवारी (९ सप्टेंबर) वेंगुर्ला तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ अध्यक्षांकडे गणेश पूजा साहित्य सुपूर्द करण्यात आले. विशाल परब यांच्या हस्ते सावंतवाडी जनसंपर्क कार्यालय येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वेंगुर्ला तालुक्यातील गणेशभक्तांच्या घरोघरी हे पूजा साहित्य सन्मानपूर्वक पोहोचवून त्यांच्या गणेशोत्सवाच्या आनंदात सहभागी व्हावे, असे आवाहन विशाल परब यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.
या कार्यक्रमाला वेंगुर्ला तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी हा उपक्रम तालुक्यातील प्रत्येक भागात प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.विशाल परब यांच्या पुढाकारातून गेली अनेक वर्षे गणेशोत्सवानिमित्त हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. सालाबादप्रमाणे यंदाही कोकणातील प्रत्येक कुटुंबाचा गणेशोत्सव आनंदात, उत्साहात आणि समाधानाने साजरा व्हावा, या उद्देशाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गणेशभक्तांच्या घरोघरी पूजा साहित्य पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.










