
वेंगुर्ला : विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच आई-वडील व वडीलधाऱ्यांचा सन्मान करावा तसेच सामाजिक जाणीव जोपासून समाजातील चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात, असे आवाहन युवा सेनेचे पंकज शिरसाट यांनी केले.
उभादांडा शाळा क्र. २ येथे शिवसेना पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उभादांडा उपसरपंच तथा शिवसेना महिला विभाग प्रमुख टीना कार्मिस आल्मेडा यांच्या पुढाकारातून शाळेला सोलर लाईट देण्यात आली. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्या, पेन आदी शालेय उपयोगी साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले. हे साहित्य पंचायत समिती सदस्या साक्षी नार्वेकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यावेळी विभाग प्रमुख नयन पेडणेकर, शाखा संघटिका रुचिरा तिरोडकर, सचिन जुवलेकर, ग्रामपंचायत सदस्य निरंजन साळगावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागेश जुवलेकर, सुनील कांबळी, मंगेश दाभोलकर, कार्मिस आल्मेडा आदी उपस्थित होते.
शाळेच्या परिसरात सोलर लाईटची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पालक व शिक्षकांनी शिवसेना पक्षाचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक सीताराम नाईक, स्नेहा परब व समृद्धी पेडणेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.












