
सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत सावंतवाडीत शिर्डीच्या धर्तीवर साईबाबांचे भव्य मंदिर उभारण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेवर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्ते व डिंगणे येथील सिंधुदुर्ग जिल्हा फळ बागायतदार संघांचे पदाधिकारी विलास सावंत यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
सावंत यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामदैवतांची मंदिरे असून नागरिकांची त्यांच्यावर दृढ श्रद्धा आहे. त्यामुळे सावंतवाडीत आणखी साईबाबा किंवा तिरुपती बालाजीसारख्या धार्मिक स्थळांची आवश्यकता नसून, जिल्ह्याला सर्वाधिक गरज अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची आहे.
गोव्यात उपचारासाठी जावे लागते आणि सिंधुदुर्गमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा नसल्याची टीका वारंवार होत असल्याचे त्यांनी नमूद केले. विज्ञानयुगात लोकांना अधिक धार्मिकतेकडे वळविण्याऐवजी आरोग्य, शिक्षण आणि रोजगारनिर्मितीवर लोकप्रतिनिधींनी भर द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आडाळी एमआयडीसीत होणाऱ्या उद्योग गुंतवणुकीचे स्वागत करतानाच तेथील उद्योगांमुळे स्थानिक युवकांना दर्जेदार रोजगार मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ एमआयडीसीची संख्या वाढविण्यापेक्षा विद्यमान औद्योगिक वसाहती सक्षम करणे महत्त्वाचे असल्याचे सांगत, आडाळी आणि कुडाळ एमआयडीसीची सद्यस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घ्यावेत, असेही त्यांनी म्हटले.
याशिवाय, सिंधुदुर्गमधील शाळांमध्ये सातत्याने घटणारी विद्यार्थी संख्या ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. कोकणातील भौगोलिक आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शैक्षणिक धोरणात बदल करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
"लोकप्रतिनिधींनी काळाची गरज ओळखून धार्मिक प्रकल्पांपेक्षा आरोग्य, शिक्षण, शेती आणि रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य द्यावे. विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्था शाबीत राहावी यासाठी शेती व शेतकरी यांना पाठबळ मिळायला हवं. मात्र याकडे दुर्लक्ष होतं असून शेती व्यवसाय वाढावा, शेती क्षेत्रात व शेतकरी संख्येत वृद्धी व्हावी, इथली फळ फळावळ व शेती अजुन समृद्ध व्हावी. त्यातूनच सिंधुदुर्गचा सर्वांगीण विकास होईल," असे मत विलास सावंत यांनी व्यक्त केले.










