
देवगड : तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर देवगड तालुक्यात झालेल्या जनता दरबारात प्रलंबित विकासकामे, वीजपुरवठा, रस्ते आणि एसटी वाहतुकीच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरले. दोन-तीन वर्षांपासून अनेक विकासकामे रखडलेली असताना ती मार्गी का लागत नाहीत, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर तब्बल सव्वातीन तास चाललेल्या या जनता दरबारात जनतेने मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण घेत अनेक समस्यांच्या तातडीच्या निराकरणासाठी सूचना करण्यात आल्या.
यावेळी उपसभापती अमोल लोके, जिल्हा परिषद सदस्य संजय बोंबडी, सुनील पारकर, देवदत्त कदम, सावी लोके, अवनी तेली, प्रभारी गटशिक्षण अधिकारी निलेश जगताप, पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, रवींद्र तिर्लोटकर, सादिक डोंगरकर, समृद्धी चव्हाण, अंकुश ठूकरुल, सदाशिव ओगले, संजना आळवे, स्नेहा अनभवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले , पालकमंत्र्यांचे प्रतिनिधी मनोज भोगटे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली इंद्रप्रस्थ हॉल येथे हा जनता दरबार झाला. महावितरण, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एसटी महामंडळाशी संबंधित विविध प्रश्नांचा यावेळी आढावा घेण्यात आला. लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी मांडलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून जीवनावश्यक स्वरूपाची सर्व कामे येत्या आठ दिवसांत मार्गी लावावीत, असे स्पष्ट निर्देश सभापती गणेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पालकमंत्री नितेश राणे हे ११ सप्टेंबर रोजी देवगड तालुका दौऱ्यावर येणार असल्याने त्यापूर्वी कामांमध्ये ठोस प्रगती दिसली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एसटीच्या प्रश्नांवरही जनता दरबारात जोरदार चर्चा झाली. विजयदुर्ग आगारामार्फत धावणारी विजयदुर्ग-पंढरपूर बस वैभववाडीपर्यंतच धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा महेश बिडये यांनी मांडला. विजयदुर्ग आगारातून सुटणाऱ्या बसफेऱ्या अनियमितपणे धावत असल्याने महामंडळाचे नुकसान होत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले.
महिलांना सवलतीची सुविधा मिळण्यासाठी कार्ड काढण्याची सक्ती करू नये, ३० सप्टेंबरपर्यंत कार्डची सक्ती करू नये, अशी मागणी संदीप साटम, माणिक दळवी, वैभव करगुटकर, विलास साळसकर व प्रकाश राणे यांनी केली. देवगड-बोरिवली बससाठी खारेपाटण येथे बुकिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विश्वनाथ खानविलकर यांनी केली.
पिकअप शेडमध्ये खासगी वाहने पार्क करून ठेवली जात असल्याने एसटी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही करण्यात आली. एनसीएमसी कार्डचे रिचार्ज एसटी वाहकांकडूनच करता येते, अशी माहिती आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर यांनी दिली. एसटीच्या विविध योजनांची ग्रामपंचायत पातळीवर पुरेशी प्रसिद्धी होत नसल्याने नागरिकांना त्याची माहिती मिळत नसल्याचा मुद्दा माणिक दळवी यांनी उपस्थित केला.
महावितरणच्या कारभाराबाबत जनता दरबारात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जीर्ण झालेले विद्युत पोल, तिर्लोट-कुणकवणमधील रखडलेली कामे तसेच विविध भागांतील वीजपुरवठ्याच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. नारिंग्रेचे सरपंच महेश राणे यांनी मिठबाव-आचरा विभागातील दहीबाव-कोटकामते-नारिंग्रे मार्गावर ३३ केव्ही व त्यानंतर ११ केव्ही वाहिन्यांसाठी करण्यात आलेल्या खोदाईमुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याचे सांगितले.
हाच प्रश्न पडवणे-फणसे मार्गावरही असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. विविध रस्त्यांवर अन्य कामांसाठी खोदाई करताना विद्युत वाहिन्या तोडल्या जातात व त्याचा फटका ग्राहकांना बसतो. अशा प्रकारे नुकसान करणाऱ्यांवर किती दंडात्मक कारवाई केली, किती नोटिसा दिल्या आणि किती दंड वसूल केला, याची माहिती द्यावी, अशी मागणी विलास साळसकर यांनी केली.
स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर उपस्थित लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हडपीड येथील नळ योजनेचे वीजबिल स्मार्ट मीटरमुळे वाढत असल्याचे सरपंच दाजी राणे यांनी निदर्शनास आणले. सहा महिने प्रस्ताव देऊनही नवीन वीज जोडण्या मिळत नसल्याच्या तक्रारीही उपस्थित करण्यात आल्या. “स्मार्ट मीटर बसविण्याचा आग्रह करण्यापेक्षा आधी तुमचा वीज वितरणाचा कारभार स्मार्ट करा; तो स्मार्ट आहे कुठे?” असा सवाल उपस्थित जनतेतून करण्यात आला. पेंढरीचे सरपंच मंगेश आरेकर यांनी मीटर काढून झाले असतानाही वीजबिल येत असल्याचे सांगितले. लिंगडाळ गणपती मंदिर ते कोटकामते वीज वितरण लाईनसाठी ४२ पोल आवश्यक असताना केवळ ३० पोलचा सर्वे केला जात असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. विचारणा केली असता थातूरमातूर उत्तरे मिळत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.
मिठबाव वीज वितरण सेक्शन देवगड तालुक्यात असतानाही ते आचरा विभागाशी जोडण्यात आल्यामुळे स्थानिक कामांना अपेक्षित गती मिळत नसल्याची तक्रार सरपंच महेश राणे यांनी केली. साडेतीन वर्षांपासून वीज वितरणाची कामे रखडलेली असून अधिकारी केवळ आश्वासने देतात; प्रत्यक्ष पाहणीसाठीही येत नाहीत, असा आरोपही यावेळी करण्यात आला. गणेश चतुर्थीच्या काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, अशी सूचना विलास साळसकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांना केली.
जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्डे, वाढलेली झाडी आणि रखडलेली कामे यावरही लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. गणेश चतुर्थीपूर्वी ही कामे मार्गी लावण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. देवगड-निपाणी व विजयदुर्ग-कासार्डे या नवीन रस्त्यांवरील प्रवासी शेड कोण बांधणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. रस्ता पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रवासी शेड बांधण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
२०२३ पासून मुणगे येथील रस्त्याचे काम सुरू असूनही ते अद्याप पूर्ण झालेले नाही, असा मुद्दा ग्रामस्थ गोविंद सावंत यांनी उपस्थित केला. निधीअभावी काम रखडल्याचे सांगितले जात असल्यावर, “लोकवर्गणी काढायची का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. मिठबाव फुल ते मुणगे मार्गावरील खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजविले जाणार का, अशी विचारणाही करण्यात आली. तसेच देवगड-निपाणी महामार्गाचे आयुर्मान ३० वर्षांचे असताना रस्त्यावर आताच खड्डे कसे पडले, असा सवाल उपस्थित करून रस्त्याच्या दर्जाबाबतही जाब विचारण्यात आला.
गणेश चतुर्थी हा कोकणातील महत्त्वाचा सण असल्याने रस्ते, वीज, एसटी वाहतूक आणि अन्य जीवनावश्यक सुविधांशी संबंधित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या समस्या तसेच लेखी स्वरूपात दिलेल्या मागण्यांवर संबंधित विभागांनी जबाबदारीने कार्यवाही करावी, असे सभापती गणेश राणे यांनी स्पष्ट केले. चार वर्षांनंतर झालेल्या या जनता दरबारात सव्वातीन तास जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करून अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण घेण्यात आले आणि अनेक प्रश्नांच्या तातडीच्या निराकरणासाठी निर्देश देण्यात आले. त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी रखडलेली कामे प्रत्यक्षात कितपत मार्गी लागतात, याकडे आता देवगड तालुक्याचे लक्ष लागले आहे.











