
देवगड : भविष्यात उद्भवणाऱ्या दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायतीने आतापासूनच नियोजन सुरू केले असून, पाणीप्रश्नाला विकासकामांपेक्षाही सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन, पाणी अडवा-पाणी जिरवा मोहीम, लोकसहभागातून बंधारे उभारणे, रेन हार्वेस्टिंगबाबत जनजागृती तसेच पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागात ‘पाणी मित्र समिती’ स्थापन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
याबाबत नगरपंचायत सभागृहात आज विशेष सभा नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी हरिदत्त माने, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोसकर यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.
देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या नैसर्गिक जलस्रोतांचा आढावा विशेष सभेत घेण्यात आला. सध्याची पाण्याची परिस्थिती गंभीर असून, जानेवारी महिन्यात साधारणपणे जी पाण्याची पातळी असते, तीच पातळी ऑक्टोबरमध्ये दिसून येत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहीम नगरपंचायत कार्यक्षेत्रात व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. रेन हार्वेस्टिंगबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असून, केवळ नगरपंचायतीच्या माध्यमातून नव्हे तर लोकसहभागातून जास्तीत जास्त कामे होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागात ‘पाणी मित्र समिती’ स्थापन करण्यात येणार आहे. संबंधित प्रभागाचे नगरसेवक या समितीचे अध्यक्ष असतील, तर नगरपंचायत कर्मचारी समितीच्या माध्यमातून आवश्यक कामकाज करतील. पाणी बचत, पाण्याचा योग्य वापर, गळती व अपव्यय रोखणे तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या समित्या कार्यरत राहणार आहेत.
नगरपंचायत प्रशासनाच्या नियोजनानुसार जुलै २०२७ पर्यंत शहराला पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध राहील, अशा पद्धतीने उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे.
अन्नपूर्णा नदीवर यंदा पाच बंधारे
देवगड-जामसंडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अन्नपूर्णा नदीवर दरवर्षी दोन ते तीन बंधारे बांधण्यात येतात. मात्र यंदा संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाच बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.दहिबाव पंप हाऊस, आयतनपूल, कुपलवाडी, दहिबावकरवाडी, कामते फडणवीसवाडी आणि शेळके घर या परिसरात आवश्यकतेनुसार तातडीने बंधारे उभारण्याची कार्यवाही केली जाणार आहे. तसेच नगरपंचायत कार्यक्षेत्रातील गोड्या पाण्याची तळी, झरे व इतर नैसर्गिक जलस्रोतांवरील पाणी अडवून भूजलपातळी वाढविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत.नवीन नळ कनेक्शनसोबत रेन हार्वेस्टिंगची अट नवीन नळ कनेक्शन देताना संबंधित घरामध्ये रेन हार्वेस्टिंग सिस्टीम उभारण्याबाबत नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, अशी भूमिका सभेत मांडण्यात आली. सन २०१६ पासून रेन हार्वेस्टिंगची अंमलबजावणी अपेक्षित असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आता पावसाच्या पाण्याचे संकलन करून ते भूजल पुनर्भरणासाठी वापरण्याची व्यवस्था प्रत्यक्षात आणणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.
‘विकासकामे थांबली तरी चालतील; पाण्याला प्रथम प्राधान्य’
पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोसकर यांनी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी दीर्घकालीन नियोजनाची गरज व्यक्त केली. “विकासकामे काही काळ मागे राहिली तरी चालतील; मात्र पाण्याच्या विषयाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. शहराला पाणी कसे पुरेल, याचे नियोजन प्रत्येकाने करावे. पाण्याचा होणारा अपव्यय थांबविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.शहराला एक दिवस आड पाणीपुरवठा करावा लागण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचेही नियोजन करण्यात येणार असून, पाणी मित्र समित्यांच्या माध्यमातून पाण्याचा अपव्यय रोखण्यावर भर दिला जाणार आहे. भूजलसाठा वाढविण्यासाठी लोकसहभागातून बंधारे उभारण्यात येणार असून, नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नैसर्गिक जलस्रोत वाचविण्यासाठी तातडीने बंधारे घालण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.लघु नळ योजनांसाठी नवीन जलस्रोत शोधणे आवश्यक असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दहिबाव नळ योजनेच्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी पाच बंधारे उभारण्याची गरज असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोसकर यांनी दिली.देवगड सडा परिसरात सध्या पाण्याचा स्वतंत्र जलस्रोत नसल्याने भविष्यात पाणीपुरवठ्याची अडचण निर्माण झाल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने एक टँकर आगाऊ आरक्षित ठेवण्याचे नियोजन केले आहे.
शिरगाव-पाडाघर योजना पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न
सध्या बंद असलेल्या शिरगाव-पाडाघर नळ योजनेचे पाणी पुन्हा देवगड-जामसंडे शहराला उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक आरक्षण दाखला उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेतूनही शहराला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आझादनगर तलावाच्या उपशावरही आता काम
जामसंडे आझादनगर येथे असलेल्या तलावाचा यापूर्वी उपसा करण्याची आवश्यकता भासली नव्हती. मात्र, मागील दहा वर्षांत तलावाचा उपसा का झाला नाही, यापेक्षा आता त्यावर काम करणे अधिक महत्त्वाचे आहे, अशी भूमिका तन्वी चांदोसकर यांनी मांडली. शहराची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन उपलब्ध असलेल्या प्रत्येक जलस्रोताचा योग्य पद्धतीने वापर आणि संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.लोकसहभागाशिवाय जलसंकटावर मात अशक्य संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती ही केवळ नगरपंचायतीची जबाबदारी नसून, नागरिकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. पाणी बचत, पाण्याचा काटकसरीने वापर, रेन हार्वेस्टिंग, नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन, बंधारे उभारणी आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.“शहरातील प्रत्येक नागरिकाने पाण्याचा प्रश्न आपला प्रश्न समजून काम केले, तरच आगामी जलसंकटावर प्रभावीपणे मात करता येईल,”











