
देवगड : आयुष्याच्या अखेरच्या प्रवासात माणसाला आपली माणसे सोबत असावीत, एवढीच अपेक्षा असते. मात्र, नात्यांचा आधार हरवलेल्या संतोष सदानंद मेस्त्री (३८) याच्या मृत्यूनंतर देवगड पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवले. सामाजिक बांधिलकी जपत पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे नाते जपले.
मूळ जामसंडे मळई येथील संतोष मेस्त्री हा कामानिमित्त सुरुवातीला मालवण येथे वास्तव्यास होता. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून तो देवगडमधील शिवनगर येथे एकटाच राहत होता. सुतारकाम तसेच अन्य मोलमजुरीची कामे करून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. गेल्या काही वर्षांपासून तो अल्पशा आजारानेही त्रस्त होता.
शनिवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास देवगड जेटीवरील तारामुंबरी सोसायटीच्या डिझेल पंपासमोर दोन होड्यांच्या मध्यभागी त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच देवगडचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
तपासादरम्यान संतोषचा भाऊ प्रफुल्ल मेस्त्री हा मालवण येथे राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. संतोषच्या कौटुंबिक परिस्थितीची जाणीव ठेवत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत यांनी प्रफुल्ल मेस्त्री यांच्या संमतीने अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली.
त्यानुसार देवगड पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने देवगड स्मशानभूमीत शनिवारी दुपारी संतोषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. पोलीस आणि ग्रामस्थांनी दाखविलेल्या या संवेदनशीलतेमुळे अखेरच्या क्षणी संतोषला माणुसकीचा आधार मिळाला.यावेळी पोलीस कॉन्स्टेबल दीपेश तांबे, होमगार्ड श्री. बोडेकर, किरण कणेरकर, राकेश कोयंडे, प्रफुल्ल मेस्त्री आदी उपस्थित होते. संतोषच्या पश्चात भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








